मोबाइलवर गेम्स खेळणं, रील्स पाहणं अभिनेत्रीला पडलं महागात; करावी लागली सर्जरी, 3 लाखांचा खर्च

तासनतास मोबाइलवर गेम खेळणं आणि रील्स पाहणं यामुळे अभिनेत्रीच्या मानेवर परिणाम झाला असून तिला थेट सर्जरी करावी लागली आहे. युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली आहे.

मोबाइलवर गेम्स खेळणं, रील्स पाहणं अभिनेत्रीला पडलं महागात; करावी लागली सर्जरी, 3 लाखांचा खर्च
अभिनेत्री शकीला
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 13, 2026 | 2:27 PM

मोबाइलवर तासनतास गेम्स खेळत राहणं, रील्स पाहणं या सवयींमुळे मानेवर प्रचंड ताण येऊन सर्जरी करण्याची वेळ येईल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. परंतु अभिनेत्री शकीलासोबत असंच काहीसं घडलं आहे. शकीलाच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रमाणापेक्षा जास्त वेळ मोबाइल फोनच्या वापरामुळे आरोग्याची ही गंभीर समस्या निर्माण झाल्याचं म्हटलं गेलं आहे. याबद्दलची माहिती खुद्द शकीलाने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. रुग्णालयातून घरी परत येतानाचा व्हिडीओ तिने युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शकीलाने तिच्या आरोग्याविषयी खुलासा केला आहे.

मोबाइल फोनचा अतिवापर महागात

सर्जरीनंतर डॉक्टरांनी तिला मानेला कॉलर लावण्याचा सल्ला दिला आहे. या व्लॉगमध्येही ती मानेला कॉलर लावूनच दिसत आहे. शकीलाने तिच्या व्हिडीओमध्ये रुग्णालयातील काही फोटो आणि घरी परतल्यानंतरही झलकसुद्धा दाखवली आहे. बेडवर तासनतास एकाच कुशीवर झोपून मोबाइल गेम खेळल्यामुळे मानेवर असा परिणाम झाल्याचं तिने सांगितलं आहे. मानेच्या नसांवर परिणाम झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च आला, असंही ती म्हणाली. शकीलाने लोकांना मोबाइल फोनचा अतिवापर टाळण्याचंही आवाहन केलं आहे. तसंच पालकांना त्यांच्या मुलांना गॅजेट्स न देण्याचाही सल्ला दिला.

शकीलाना या व्हिडीओमध्ये स्वत:चीच थट्टा केली आहे. “आता मला अंथरुणातून उठणं, जेवण करणं यांसारख्या साध्या कामांसाठीही इतरांची मदत घ्यावी लागतेय. माझी नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. मला तुम्हाला एक खूप गंभीर गोष्ट सांगायची आहे. फोन खूप उपयुक्त आहे, पण त्याचा अतिवापर करू नका. मी बेडवर एका कुशीवर झोपून चार-चार तास मोबाइल फोनवर गेम्स खेळायचे. मी फक्त चहा किंवा कॉफी पिण्यासाठीच उठायचे. चहा प्यायल्यानंतर मी पुन्हा तोच गेम खेळायला लागायचे आणि मग तासनतास युट्यूब, इन्स्टाग्रामवर रील्स बघत बसायचे. बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आणि फोनच्या अतिवापरामुळे माझ्या मानेतील नसांवर वाईट परिणाम झाला आहे. अखेर मला सर्जरी करावी लागली आहे”, असं तिने सांगितलं.

याविषयी ती पुढे म्हणाली, “फोन फक्त महत्त्वाच्या गोष्टींसाठीच वापरा. निरुपयोगी व्हिडीओ पाहणं टाळा. अगदी माझे व्हिडीओसुद्धा नकोत. नाहीतर तुम्हालाही तीन लाख रुपये खर्च करावे लागतील आणि असह्य वेदना सहन कराव्या लागतील.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us