वडिलांनी जुळ्या बहिणींशी केलं लग्न; अभिनेत्रीला आजही माहीत नाही तिची खरी आई कोण?

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती कृष्णा तिच्या खासगी आयुष्यामुळे आणि वडिलांनी जुळ्या बहिणींशी केलेल्या लग्नामुळे नेहमीच चर्चेत असते. दोघींकडून मला समान प्रेम मिळाल्याचं श्रुती म्हणते. तिची खरी आई कोण, हे तिला माहीत नाही.

वडिलांनी जुळ्या बहिणींशी केलं लग्न; अभिनेत्रीला आजही माहीत नाही तिची खरी आई कोण?
अभिनेत्री श्रुती कृष्णा आणि तिच्या दोन आई
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2026 | 10:49 AM

श्रुती कृष्णा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती कन्नड चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करतेय. आतापर्यंतच्या 36 वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये श्रुतीने 150 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिला तीन वेळा राज्य पुरस्कारानेही गौरविण्यात आलं आहे. पडद्यावर दमदार अभिनय करणाऱ्या श्रुतीचं खरं आयुष्यसुद्धा एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावं असंच आहे.

श्रुतीचं खरं नाव गिरीजा असून तिचे वडील जीवी कृष्णा हे थिएटर कंपनी चालवायचे. जीवी यांनी त्यांच्याच थिएटर मंडळातील जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं होतं. त्यांना श्रुती, शरण आणि उषा अशी तीन मुलं झाली. आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही मुलांना आजवर हेच माहीत नाही की त्यांची ‘बायोलॉजिकल’ जन्मदाती आई कोण आहे? या तिन्ही भावंडांना दोन्ही आईंकडून एकसमान प्रेम मिळालं आहे. श्रुतीने अनेक मुलाखतींमध्ये याबद्दलचा खुलासा करत सांगितलं की, तिच्या दोन आई आहेत आणि दोघीही तिच्यावर खूप प्रेम करतात.

वडिलांनी दोन बहिणींशी लग्न केल्यामुळे श्रुतीचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत राहिलं आहे. मात्र याबद्दल तिने कधीच कमीपणा वाटून घेतला नाही. उलट ती अभिमानाने प्रत्येक मुलाखतीत हेच सांगते की, तिच्या दोन आई आहेत आणि कोणत्याही अपत्याला त्यांची खरी आई कोण, हे माहीत नाही. यातच सर्वजण खुश आहेत. एका मुलाखतीत श्रुतीने सांगितलं होतं, “आमची खरी आई कोण आहे, हे जाणून घेणं आम्हाला गरजेचं वाटलं नाही. कारण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि आमच्या दोन्ही आईंनी आम्हाला एकसमान प्रेम दिलं आहे. त्यामुळे कोण कोणाचं बाळ आहे, याने काही फरक पडत नाही.”

श्रुती आणि तिच्या दोन आई

श्रुती लहानपणापासूनच इंडस्ट्रीत काम करतेय. अवघ्या 14 व्या वर्षी तिने ‘नंबिद्रे नंबी बित्रे बिडी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी तिचं स्क्रीनवरील नाव प्रियदर्शिनी असं ठेवण्यात आलं होतं. मात्र श्रुतीला हे नाव अजिबात आवडलं नव्हतं. इंडस्ट्रीत नवीन असल्यामुळे तिने तेव्हा या नावावर आक्षेप घेतला नव्हता. नंतर दिग्दर्शक द्वारकीश यांच्या चित्रपटादरम्यान तिने नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तिने श्रुती हे नाव ठेवलं.

सुरुवातील कन्नड सिनेसृष्टीत यश मिळवल्यानंतर श्रुतीने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली. ‘अगाथा’ या चित्रपटासाठी तिला पहिला कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘कल्की’साठी तिला तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ऑनस्क्रीन अनेक भावनिक भूमिका साकारल्यामुळे तिला ‘ट्रॅजेडी क्वीन’ असंही म्हटलं जाऊ लागलं. श्रुतीने करिअरच्या शिखरावर असताना दिग्दर्शक एस. महेंद्रशी लग्न केलं. मात्र लग्नाच्या 11 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगी आहे. त्यानंतर 2013 मध्ये तिने पत्रकार आणि कवी चक्रवर्ती चंद्रचूडशी दुसरं लग्न केलं. मात्र हे लग्नसुद्धा फक्त वर्षभर टिकलं. चित्रपटांमध्ये काम करणारी श्रुती आता राजकारणातही सक्रिय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us