आनंदाची बातमी, लग्नानंतर 8 महिन्यांतच तेजस्विनी लोणारी झाली आई, घरी आला राजकुमार
मराठी कलाविश्वातून सध्या एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर आई-बाबा झाले आहेत.

मराठी कलाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर आई-बाबा झाले आहेत. तेजस्विनीने गोंडस मुलाला जन्म दिला असून, त्यांच्या घरी चिमुकल्या राजकुमाराचं आगमन झालं आहे.
सोशल मीडियावरून कुटुंबीयांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तेजस्विनीची नणंद आणि शिवसेनेच्या नेत्या प्रिया सरवणकर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत आनंद व्यक्त केला. ‘आज मी आत्या झाले. आमच्या घरात चिमुकल्या राजकुमाराचं आगमन झालं आहे. माझा भाऊ बाबा झाला आणि मला आयुष्यातलं सगळ्यात सुंदर नातं मिळालं. आत्या!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच तेजस्विनी आणि समाधान यांचं अभिनंदन करत त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या.
समाधान सरवणकरांकडून बाबा झाल्याचा आनंद व्यक्त
समाधान सरवणकर यांनीदेखील बाबा झाल्याचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने कमेंट्स करत त्यांचं अभिनंदन केलं असून, बाळ आणि आईला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे सरवणकर आणि लोणारी कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे.
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
दरम्यान, तेजस्विनीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटातून केली होती. त्यावेळी तिचं दहावीचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. या चित्रपटात तिने जितेंद्र जोशी यांच्या नायिकेची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘गुलदस्ता’, ‘बायको नंबर 1’ आणि ‘बर्नी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली.
चित्रपटांसोबतच तेजस्विनीने मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमधून तिने प्रेक्षकांची दाद मिळवली. ‘बिग बॉस मराठी’मधील सहभागामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. अभिनेत्री म्हणून काम करण्यासोबतच तेजस्विनी निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे.
आता तेजस्विनी आणि समाधान यांच्या आयुष्यात चिमुकल्या बाळाच्या रूपाने नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. चाहत्यांकडून दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सोशल मीडियावर त्यांच्यासाठी अभिनंदनाच्या संदेशांची रेलचेल पाहायला मिळत आहे.