Adinath Kothare : ‘बॉलिवूड स्टारसारखा आव…’ आदिनाथ कोठारेनं सांगितला यामी गौतमसोबत काम करण्याचा अनुभव
Adinath Kothare : मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे यामी गौतमसोबत 'नई नवेली' या सिनेमात झळकणार असून अभिनेत्यानं यामीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

आदिनाथ कोठारे दोन मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार असून यामध्ये तो पूर्णपणे वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे. नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित आणि मोठ्या बजेटच्या ‘रामायण’ या चित्रपटात आदिनाथ ‘भरत’ची भूमिका साकारणार असून या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत असतानाच, आदिनाथचा ‘नई नवेली’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘नई नवेली’मध्ये आदिनाथ हे यामी गौतमसोबत भूमिका साकारणार आहे. आपल्या या सह-कलाकांराबद्दल आणि चित्रपटातील इतर कलाकारांचं आदिनाथनं खूप कौतुक केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्यानं कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केलाय.
यामी गौतमबद्दल काय म्हणाला आदिनाथ कोठारे?
यामी गौतमसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, असं विचारलं असता आदिनाथ म्हणाला की, ‘ती अत्यंत साधी आणि नम्र आहे. यामी गौतमला मिळालेलं यश पाहता, जेव्हा तुम्ही तिच्यासमोर उभे असता आणि तिच्याशी संवाद साधता, तेव्हा ती इतकं मोठं यश मिळवलेली व्यक्ती वाटत नाही. ती अगदी सामान्य व्यक्तीसारखी आहे. तिच्याशी बोलायला आणि तिच्यासोबत काम करायला खूप सोपं आणि छान वाटतं.’
‘ती एखाद्या बॉलिवूड स्टारसारखा आव आणत नाही. ती अत्यंत हुशार आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करणं हा खरोखरच सन्मान आणि आनंदाचा विषय आहे असं मला वाटतं. या प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्यच आहे. ती केवळ मलाच नाही, तर इतर कलाकारांना आणि अगदी छोट्या भूमिका करणाऱ्यांनाही मदत करत होती.’
‘मला वाटतं की, चांगला चित्रपट बनवण्यासाठी हेच आवश्यक असते. ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. मला तिचं काम जवळून पाहता आलं आणि ते तिच्या अभिनयातून दिसून येतं. खरं तर, जेव्हा मी तिच्यासोबत काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी नुकताच ‘हक’ हा चित्रपट पाहिला होता. त्यातील तिच्या अभिनयानं मी भारावून गेलो होतो. आणि मग ‘आर्टिकल ३७०’, ‘हक’, ‘विकी डोनर’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळणं, ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.’ असं आदिनाथ शेवटी म्हणाला. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ला दिलेल्या मुलाखतीत आदिनाथ कोठारे बोलत होता.