Sara Gurpal : लग्नानंतर 47 दिवस घरात डांबून ठेवलं, दीर अंगावर धावून आलेला अन्…प्रसिद्ध अभिनेत्रीचा शारीरिक छळ; सांगितला प्रसंग
Sara Gurpal : अभिनेत्री सारा गुरपालनं तिच्या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री आणि गायिका सारा गुरपाल आज इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. अलीकडेच, ती ‘राईज अँड फॉल’ या शोमध्ये दिसली होती. शो दरम्यान तिची खूप चर्चा झाली. मात्र, खऱ्या आयुष्यात सारानं अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. सारानं खुलासा केला आहे की, लग्नानंतर तिचा छळ झाला होता. तिला 47 दिवस घरातच डांबून ठेवण्यात आलं होतं. अभिनेत्री कशीबशी आपला जीव वाचवून निसटली.
सारा गुरपालनं सांगितला प्रसंग
हॉटरफ्लायशी बोलताना सारानं सांगितलं की, तिनं तिच्या करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं. तिला वाटलं की, लग्न करायचंच असेल तर करून टाकूया. तो मुलगा चांगला होता, त्याचं कुटुंबही चांगलं होतं, पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला. सारा म्हणाली, ‘लग्नानंतर मला 47 दिवस घरातच डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यानं मला 47 दिवस बाहेर जाऊ दिलं नाही. माझं कोर्ट मॅरेज झालं होतं. मी लग्नाचे विधी केले नाहीत. कारण, मला त्यावेळी अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करायचा होता. ही कल्पना त्याचीच होती.’
सारानं सांगितलं की, जेव्हा तिला अमेरिकेचा व्हिसा मिळाला, तेव्हा त्या माणसानं तिचा छळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा ती काम करायची, तेव्हा तो तिच्याशी भांडायचा. त्यानं तिचं इन्स्टाग्राम अकाउंटसुद्धा डिलीट केलं होतं. ती कधीही काम करणार नाही, कधीही कॅमेऱ्यासमोर येणार नाही आणि कधीही म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनय करणार नाही, हे जर मान्य असेल तरच अमेरिकेला जाण्याची परवानगी मिळेल, अशी अट अभिनेत्रीच्या नवऱ्यानं घातलेली. सारा म्हणाली की, तिनं त्याच्या सूचनांचं पालन केलं आणि शक्य ते सर्व काही केलं. ती वर्षभर सोशल मीडियापासून दूर होती.
सारानं सांगितलं की, तिच्या एक्स पतीचं कुटुंब अमेरिकेत राहत होतं. जेव्हा ती अमेरिकेत राहायला गेली, तेव्हा त्या माणसानं तिला त्याच्या रेस्टॉरंटमध्ये नोकरीची ऑफर दिली, पण तिनं नकार दिला, तेव्हा त्यानं तिला घरातच डांबून ठेवलं. अभिनेत्रीचा एक्स पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिच्या सासरच्या घरी तिला मारहाणीसह शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं. एकदा पतीचा भाऊ रागाच्या भरात तिच्यावर धावून आला होता. हे सर्व घडत असताना तिचा पतीसुद्धा समोर होता. पण, त्यानं काहीच केलं नाही. नंतर अभिनेत्रीनं पोलिसात तक्रार केली. त्यानंतर ती भारतात परतली अन् पुन्हा करिअरला सुरुवात केली.
