मनापासून मॅनिफेस्ट केलेली गोष्ट..; आदिनाथ कोठारेनं सांगितला रंजक किस्सा
अभिनेता आदिनाथ कोठारेनं 'सिस्टम' या हिंदी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ही भूमिका त्याला कशी मिळाली, याविषयीची पोस्ट त्याने सोशल मीडियावर लिहिली आहे. मॅनिफेस्टेशन कशा पद्धतीने काम करतं, याचं उत्तम उदाहरण त्याने चाहत्यांना दिलं आहे.

टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटी तिन्ही प्लॅटफॉर्मवर सध्या चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तो हिंदीपासून मराठी विश्वात तितकंच सातत्य टिकवून अनेक प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होताना दिसतोय. ॲमेझॉन प्राईमच्या ‘सिस्टम’मध्ये त्याने साकारलेली आलोक ही भूमिका आणि त्याची फिल्मी गोष्ट त्याने सोशल मीडिया वर शेअर केली आहे. एखादी गोष्ट मनापासून मॅनिफेस्ट केली ती आपल्या नशिबात येते याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव आदिनाथने शेअर केला आहे. ‘सिस्टम’मध्ये त्याने एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून तो सध्या बॉलिवूड मधल्या अनेक बड्या स्टार्ससोबत आणि दिग्दर्शकांसोबत काम करताना दिसतोय.
‘सिस्टम’ या चित्रपटाचा अनुभव शेअर करताना आदिनाथ सांगतो, “मी एका बॉलिवूड अवॉर्ड फंक्शनला गेलो असताना माझी भेट दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्यासोबत झाली. मी त्यांना मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे, असं सहज बोलून गेलो आणि अगदी दुसऱ्याच दिवशी मला कास्टिंगसाठी फोन आला. माझं सिस्टमसाठी ऑडिशन झालं आणि मी या चित्रपटाचा भाग सुद्धा झालो. कधीतरी आपण मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी या पूर्ण होतात आणि तसंच माझं हे एक स्वप्न पूर्ण झालं.”
‘सिस्टम’ हा एक हिंदी कोर्टरुम ड्रामा आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. भ्रष्टाचार आणि वैयक्तिक संघर्षाशी संबंधित एका प्रकरणात अडकलेल्या कायदेतज्ज्ञांची भूमिका त्यांनी साकारली आहे. 22 मे 2026 पासून हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. मूळ हिंदी भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट तेलुगू आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही डब करण्यात आला आहे.
‘सिस्टम’मध्ये आदिनाथने आलोक ही भूमिका साकारली असून दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे. आगामी काळात आदिनाथ बॉलिवूडमधल्या अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्सचा भाग होणार असून त्यात ‘रामायण’, ‘गांधी’ यांसारख्या चित्रपटांचाही समावेश असल्याचं कळतंय. याशिवाय आदिनाथ कोठारे शिरगाव या रहस्यमय शहरावर आधारित ‘डिटेक्टिव्ह धनंजय-रहस्यजाल’ या मराठी ओरिजनल थरारपटातही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत पुष्कराज चिरपुटरकरही प्रमुख भूमिकेत दिसेल. हा थरारपट श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित आणि गिरीश जयंत जोशी लिखित ही मालिका बाबुराव अर्नाळकर यांच्या गाजलेल्या साहित्यिक निर्मितीवर आधारित आहे.