‘धुरंधर 2’च्या त्या व्हायरल व्हिडीओवर भडकला आदित्य धर; म्हणाला ‘अशांवर कठोर कारवाई..’

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटातील रणवीरचा एक एआय जनरेटेड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर दिग्दर्शक आदित्य धरने तीव्र संताप व्यक्त केला आहे. असा व्हिडीओ बनवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा त्याने इशारा दिला आहे.

धुरंधर 2च्या त्या व्हायरल व्हिडीओवर भडकला आदित्य धर; म्हणाला अशांवर कठोर कारवाई..
Aditya Dhar and Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 26, 2026 | 12:43 PM

सध्या थिएटरपासून सोशल मीडियावर सर्वत्र आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. परंतु यादरम्यान काही नेटकरी सोशल मीडियावर एआयद्वारे बनावट व्हिडीओ बनवून ते व्हायरल करत आहेत. अशाच एका वादग्रस्त व्हिडीओवर दिग्दर्शिक आदित्य धरने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने त्याने अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. व्हायरल एआय व्हिडीओमध्ये रणवीर सिंहची भूमिका म्हणजेच हमजा/जसकीरत हा सिगारेट ओढत पगडी बांधताना दाखवण्यात आला आहे. यावरून शीख समुदायाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मूळ चित्रपटात असं कोणतंही दृश्य नसताना एआयद्वारे तो बनवण्यात आला असून असं करणं अत्यंत चुकीचं असल्याचं आदित्यने स्पष्ट केलं आहे.

आदित्य धरची पोस्ट-

‘देशभरात आणि जगभरात ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाला जो प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रेमाचा मी कायम ऋणी असेन. परंतु काहीजण अधिकृतरित्या प्रदर्शित झालेल्या प्रमोशनल मटेरियलला मॉर्फ करून, फसवणूक करणारे व्हिडीओ, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवत आहेत. ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली आहे. अशाच एक बनावट/खोट्या फोटोमध्ये हमजा/ जसकीरतला पगडी बांधताना स्मोकिंग करताना खोटेपणानं दाखवलं आहे. हे अजिबात सत्य नाही आणि आमच्या चित्रपटात किंवा कोणत्याही अधिकृत मटेरियलमध्ये असं दृश्य नाही,’ असं त्याने लिहिलं आहे.

‘लोकांना भडकवण्यासाठी आणि खोडसाळपणा करण्यासाठी जाणूनबुजून असा प्रकार करण्यात आला आहे. शीख समाजासाठी माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि चित्रपटातील प्रत्येक भूमिका, दृश्य, सादरीकरण अत्यंत संवेदनशीलपणे, आदरपूर्वक आणि जबाबदारीने शूट करण्यात आलं आहे. बनावट कंटेंटद्वारे चुकीची माहिती पसरवणं हा अप्रामाणिकपणा आणि दुर्भावनापूर्ण आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी अधिकृत कंटेंटवरच विश्वास ठेवावा आणि त्या हेतूनेच चित्रपट पहावा. चुकीच्या हेतूने पसरवल्या जाणाऱ्या एआय जनरेटेड कंटेंटला बळी पडू नये. अशा गोष्टींवर कडक कारवाई करण्यात येईल,’ अशा शब्दांत त्याने राग व्यक्त केला आहे.

‘धुरंधर 2’ या चित्रपटाची जगभरातील कमाई 919 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याआधी क्लायमॅक्सचाही एआय व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जसकीरत त्याच्या कुटुंबीयांची आनंदाने भेट घेताना दिसला होता. मूळ चित्रपटाचा शेवट मात्र असा नव्हता.

Follow Us