
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या सहाव्या आठवड्यातही थिएटरमध्ये टिकून आहे. हा 2025 या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ने आतापर्यंत अनेक चित्रपटांना मात दिली आहे. परंतु अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या कमाईच लक्षणीय घट झाल्याचं पहायला मिळतंय. प्रदर्शनाच्या सहाव्या मंगळवारी ‘छावा’ने 1.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सोमवारच्या कमाईतही जवळपास 65 टक्क्यांची घट पहायला मिळाली. थिएटरमध्ये ‘छावा’चा अखेरचा आठवडा जवळ आला असून आतापर्यंत या चित्रपटाने भारतात तब्बल 586.35 कोटी रुपये कमावले आहेत.
‘छावा’च्या तेलुगू व्हर्जनलाही फटका बसला आहे. सोमवारी या चित्रपटाने फक्त 0.1 कोटी रुपये कमावले आहेत. तर रविवारची कमाई 0.15 कोटी रुपये इतकीच झाली. जगभरात ‘छावा’ने आतापर्यंत 787.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने आजवर अनेक विक्रम मोडले आहेत आणि अनेक हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे. यात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाचाही समावेश आहे. आता तिच्याच आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाचा फटका ‘छावा’ला बसणार असल्याचं दिसतंय.
मंगळवारी ‘छावा’च्या प्रेक्षकवर्गातही बरीच घट पहायला मिळाली. 2533 शोजमध्ये फक्त 7.97 प्रेक्षकवर्ग होता. मुंबई आणि हैदराबादमध्येही फक्त 9.50 टक्के प्रेक्षकवर्ग होता. यापैकी मुंबईत ‘छावा’चे 489 शोज होते, तर हैदराबादमध्ये फक्त 59 शोज होते. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून दिनेश विजन याचे निर्माते आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदानासोबतच आशुतोष राणा, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये यांच्याही भूमिका आहेत. 14 फेब्रुवारी रोजी ‘छावा’चा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. तर त्याचा तेलुगू व्हर्जन 7 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर येत्या 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका आहे.
भारतात- 586.35 कोटी रुपये
जगभरात- 787.5 कोटी रुपये