
जगप्रसिद्ध ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जोपर्यंत अभिनेत्री ऐश्वर्या राय हजेरी लावत नाही, तोपर्यंत त्या फेस्टिव्हलला चार चांद लागत नाही, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ‘कान’च्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाजात पोहोचतात. परंतु जेवढी चर्चा ऐश्वर्याची होते, तेवढी कोणाची होत नाही. यंदाही ऐश्वर्या तिच्या लेकीसोबत या फिल्म फेस्टिव्हलला पोहोचली होती. या दोघींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओमध्ये ज्याप्रकारे ऐश्वर्याने आराध्याला पकडलं आहे, त्यावरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
रेड कार्पेटसाठी तयार झाल्यानंतर ऐश्वर्या तिच्या रुममधून बाहेर निघते. यावेळी तिच्यासोबत मुलगी आराध्यासुद्धा आहे. हॉटेल रुममधून बाहेर निघाल्यानंतरही ऐश्वर्या एका क्षणासाठीही आराध्याचा हात सोडत नाही. तिचा हात आपल्या हातात घेऊनच ती चालते. मध्येच ती मुलीला किस करते. यावेळी आराध्यासुद्धा तिच्या आईवर प्रेमाचा वर्षाव करते. परंतु मायलेकीच्या अशाच वागण्यामुळे काहींनी त्यांना ट्रोल केलंय.
बेटी आराध्या पर प्यार लुटातीं ऐश्वर्या राय का #Cannes2025 से वीडियो वायरल#AishwaryaRaiBachchan #aaradhyabachchan #CannesFilmFestival pic.twitter.com/IdYlfDr7dr
— NBT Entertainment (@NBTEnt) May 26, 2025
‘बेबी? आता आराध्या 14 वर्षांची आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘ती नेहमीच मुलीचा हात धरून चालते. नेमकी समस्या काय आहे’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘मुलीची नेमकी समस्या काय आहे’, असंही काहींनी विचारलं आहे. ‘ही लहान आहे हे तर समजतंय. पण 10 वर्षांची मुलगीसुद्धा समजूतदारपणे वागते. पण आई इतकी ओव्हर प्रोटेक्टिव्ह का वागतेय’, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. आराध्याला प्रत्येक कार्यक्रमांमध्ये घेऊन जाण्याबद्दलही नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. ‘ती शाळेत जात नाही का, प्रत्येक वेळी सोबत कशी येते’, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान ‘कान फिल्म फेस्लिव्हल’च्या रेड कार्पेटवरील लूकने ऐश्वर्याने जगभरातील माध्यमांचं लक्ष वेधलं होतं. आयव्हरी रंगाची साडी, त्यावर टिश्यू सिल्क दुपट्टा, गळ्यात रुबीची माळ आणि या सर्वांत उठून दिसणारं भांगेतील लाल सिंदूर.. असा तिचा एकंदर लूक होता. ऐश्वर्याच्या भांगेतील सिंदूर हा अत्यंत चर्चेचा विषय ठरला होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. अशातच ऐश्वर्याने तिच्या भांगेत सिंदूर लावून ‘कान’च्या रेड कार्पेटवर ठळकपणे संदेश दिला होता.