
दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचा भव्यदिव्य कार्यक्रम नुकतात पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार तिथे उपस्थित होते. त्याचसोबत चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला. अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यामध्ये महाराजांची भूमिका साकारणार आहे. याच कार्यक्रमातील अभिनेते अजय पूरकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते “आमचा चित्रपट बंद करून दाखवा” असं थेट आव्हान देताना दिसत आहेत. अजय पूरकर यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कार्यक्रमात अजय पूरकर यांना जेव्हा मंचावर बोलावलं गेलं, तेव्हा ते म्हणाले, “आम्ही अजूनही सर्वजण मानतो की, रायगडावर न्याय होतो बरं का! जे समाजासाठी काम करू इच्छितात, जे चांगलं काम करू इच्छितात, त्यांच्या वाटेत काटे पसरवणारी अनेक लोकं असतात. ती सगळ्यांच्याच नशिबी असतात. चांगलं काम करणाऱ्या टीमच्या नशिबी तर असतातच. तर त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे आजही आहेत, पुढेही राहणारच आहेत. म्हणून मी म्हटलंय की रायगडावर न्याय होतो बरं का! कोणीही या गैरसमजुतीत राहू नये की हे काम बंद पडू शकतं, बंद पाडू शकतो. असं काही होत नाही. आम्ही खंबीरपणे इथे उभे आहोत आणि करायचे असतील तर अजूनही प्रयत्न करा. आज तुमच्या माध्यमातून मी हे सांगतोय, फक्त नावं घेत नाहीये, एवढंच आहे.”
अजय पूरकर यांनी कोणाला हे आव्हान दिलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु चित्रपट निर्मितीदरम्यान अडथळे निर्माण करणाऱ्यांना अजय यांनी थेट इशारा दिल्याचं समजतंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘रायगडावर न्याय होतो हे वाक्यच डोळ्यात पाणी आणणारं आहे,’ असं एकाने म्हटलंय. तर ‘नाव घ्यायची हिंमत दाखवा, का विरोध करतायेत त्यांची पण बाजू समजेल मग,’ असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘धार्मिक चित्रपट येऊ लागली की लोकांच्या पोटात दुखू लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही जगाला माहीत करून देत आहात. हे काम कौतुकास्पद आहे,’ अशीही कमेंट एका युजरने केली.