
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी सोशल मीडियावर कलाकारांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर श्रीराम यांच्या भूमिकेत आहे तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. रणबीर आणि साईशिवाय अरुण गोविल, लारा दत्ता यांचेही फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. या मोठ्या प्रोजेक्टमध्ये एक मराठी अभिनेतासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. त्यानंतर आता अभिनेता अजिंक्य देवने रणबीरसोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे. या चित्रपटात अजिंक्य देव हा विश्वामित्र यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.
अजिंक्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणबीरसोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघंही काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत अजिंक्यने ‘रामायण’मध्ये भूमिका साकारत असल्याचं जाहीर केलं. ‘या फोटोविषयी स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास.. मी आरकेसोबत (रणबीर कपूर) ‘रामायण’ या मोठ्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. आता दीड वर्ष झालंय, आधी मी नीतू कपूर मॅमसोबत काम केलं. त्यानंतर एका वेब सीरिजसाठी करिश्मा कपूरसोबत स्क्रीन शेअर केला आणि आता रणबीर कपूरसोबत काम करतोय’, असं अजिंक्यने लिहिलंय. मात्र हा फोटो व्हायरल होताच त्याने इन्स्टाग्रामवर तो डिलिट केला. तोपर्यंत अनेकांनी त्याचा स्क्रीनशॉट काढला होता.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. या फोटोंमध्ये रणबीर हा श्रीराम यांच्या वेशभूषेत तर साई ही सीतेच्या पोशाखात दिसली होती. त्याआधी व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री लारा दत्ता ही कैकेयी आणि अरुण गोविल हे दशरथ यांच्या भूमिकेत दिसले होते.
‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी नंतर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाली. या चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.