Ajinkya Deo : कालपर्यंत हा लंगोट लावून…कोणाबद्दल बोललेले बाळासाहेब? अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा
Ajinkya Deo On Balasaheb Thackeray : अजिंक्य देव यांनी नुकत्याच एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांचा किस्सा सांगितला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेबांचं महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर असलेलं प्रेम, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि कलाकारांविषयीची आपुलकी याबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केलं. यावेळी त्यांनी मातोश्रीवर घडलेला एक खास किस्साही सांगितला. बाळासाहेबांच्या हातात सत्ता उशिरा आली, हे महाराष्ट्राचं दुर्दैव. ती आधी यायला हवी होती आणि महाराष्ट्राचा कायापालट झाला असता, असंही अजिंक्य देव म्हणाले.
अजिंक्य देव यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण
अजिंक्य देव म्हणाले की, ‘सर्जा’ सिनेमाचं आम्ही कोल्हापूरला शूटिंग केलं, तेव्हा सगळे सगळे मावळे हे शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरे खूप मनस्वी होते. त्यांचं कलेवर प्रेम होतंच पण, त्याचसोबत त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम होतं. त्यांचं प्रत्येक मराठी माणसावर प्रेम होतं. म्हणून, त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हटलं जातं. हे प्रेम कुठेतरी आजच्या आपल्या नेत्यांमध्ये कमी पडतंय. आजचं गणित कुठेतरी बदललं आहे, असं मी म्हणेन.’
‘महाराष्ट्राचा कायापालट झाला असता’
पुढे अजिंक्य देव म्हणाले की, ‘मी मातोश्रीवर बाळासाहेबांसोबत गप्पा मारत बसलेलो. तेव्हा कुणीतरी आले आणि बसले. तर बाळासाहेबांनी मला विचारलं, ह्याला ओळखलंस का? मी नाही म्हटलं. त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘अरे! कालपर्यंत हा लंगोट लावून मासे पकडत होता, आता मी त्याला महापौर केलंय.’ बाळासाहेब असं बोलायचे, त्याचं कोणाला वाईट वाटायचं नाही. त्यांच्या हातात सत्ता उशिरा आली, हे महाराष्ट्राचं दुर्दैव. ती आधी यायला हवी होती आणि महाराष्ट्राचा कायापालट झाला असता. त्यामुळे, मराठी सिनेमे का चालत नाहीत, हे आज विचारण्याची गरज भासली नसती.’ ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव बोलत होते.
दरम्यान, अजिंक्य देव यांच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या ते ‘रामायण‘ या सिनेमामुळे चर्चेत आले आहेत. या सिनेमात त्यांनी विश्वामित्र यांची भूमिका साकारली असून त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.