तेव्हाच कळून चुकलेलं..; ‘धुरंधर’ हिट होताच अक्षय खन्नासाठी एक्स गर्लफ्रेंडची खास पोस्ट

'धुरंधर'मधील अरबी भाषेतील गाणं आणि त्यावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री.. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रत्येकाच्या फीडमध्ये झळकतोय. हाच व्हिडीओ पाहून अक्षयच्या एक्स गर्लफ्रेंडने खास पोस्ट लिहिली आहे. त्याचसोबत जुना फोटोसुद्धा शेअर केला आहे.

तेव्हाच कळून चुकलेलं..; धुरंधर हिट होताच अक्षय खन्नासाठी एक्स गर्लफ्रेंडची खास पोस्ट
Akshaye Khanna and Tara Sharma
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 12, 2025 | 1:27 PM

सध्या थिएटर आणि सोशल मीडियावर एकाच अभिनेत्याची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे अक्षय खन्ना. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटातील गाणं आणि त्यावर अक्षय खन्नाची एण्ट्री.. हे अक्षरश: वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या चित्रपटात त्याने रेहमान डकैतची खलनायकी भूमिका साकारली आहे. तरीसुद्धा त्याचं अभिनय, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स लोकांना इतका आवडलाय की त्याला थेट ‘ऑस्कर’ पुरस्कार द्यावा अशी मागणी होत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण त्याचं आणि या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अशातच अक्षयची जुनी मैत्रीण आणि एक्स गर्लफ्रेंड तारा शर्माच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय. अक्षयसोबतचा जुना फोटो शेअर करत तिने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

तारा शर्माची पोस्ट-

अक्षयला खूप खूप शुभेच्छा. आम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नाही परंतु आमचा इन्स्टा फीड ‘धुरंधर’ने भरलेला आहे. खासकरून हे गाणं आणि त्यावर तुझी एण्ट्री. तुला आणि तुझ्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी मी हा मेसेज लिहित आहे. हे गाणं, तुझा स्वॅग आणि तुझी ऊर्जा… सर्वच कमाल आहे. आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतोय आणि आता तुला तुझं सर्वांत आवडीचं काम म्हणजेच अभिनय करताना पाहणं खरंच खूप कमालीचं वाटतंय. आपल्या शाळेतील नाटकात काम करून आपण अभिनयविश्वात पहिलं पाऊल ठेवलं होतं. तेव्हापासूनच मला कळून चुकलं होतं की तू अभिनयक्षेत्रातच पुढे जाशील’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

‘मला माहीत असलेल्या लोकांपैकी तू तुझं खासगीपण सर्वांत जपणारा आहेस. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे आणि तुझ्या कठोर मेहनतीचं फळ तुला मिळताना पाहून मला खूप आनंद होत आहे. हा फोटो शेअर करत मी जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. माझ्या आईकडून आणि माझ्याकडून तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला गुड लक. मला माहितीये तू सोशल मीडियावर नाहीस, पण तरीसुद्धा या हँडलला टॅग करतेय’, असं तिने पुढे लिहिलंय.

फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की एकेकाळी अक्षय आणि तारा यांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. 2007 मध्ये करण जोहरच्या चॅट शोमध्ये जेव्हा अक्षयला याविषयी विचारलं गेलं, तेव्हा त्याने तारासोबतच्या नात्याचं सत्य सांगितलं होतं. अक्षय आणि ताराने जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतरही त्यांच्यातली मैत्री कायम राहिली. 2007 मध्ये ताराने रुपक सलूजाशी लग्न केलं.