Actress Death : आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्रीचे निधन, वयाच्या 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डार्लिंग्स' या नेटफ्लिक्सच्या डार्क कॉमेडी-ड्रामामध्ये दिव्याने एका महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या नेटफ्लिक्सवरील चित्रपट ‘डार्लिंग्स’मध्ये काम केलेल्या अभिनेत्री दिव्या विनेकरचे निधन झाले आहे. दिव्याची मैत्रीण आरजे रोहिणी रामनाथन हिने याबाबत माहिती दिली. दिव्याच्या निधनाची माहिती तिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. डार्लिंग्स चित्रपटात तिने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. तिच्या अचानक जाण्याने तिच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रोहिणी यांनी आपल्या पोस्टमध्ये काय सांगितले?
आपली लाडकी डीव्ही (दिव्या विनेकर) आता आपल्यात नाही. हे खूप अचानक आणि अनपेक्षित घडले. सर्वजण या क्षणी तीव्र दुःखातून जात आहेत. डीव्ही या नावाने आम्ही दिव्याला प्रेमाने हाक मारायचो. दिव्या माझ्यासाठी एक आधार होती. दिव्या खूपच दयाळू होती. आम्हाला दिव्याची आठवण कायम येत राहील. आमच्या आयुष्याचा एक भाग बनल्याबद्दल दिव्याचे धन्यवाद,” असे आरजे रोहिणीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे.
दिव्या विनेकरने केले या चित्रपटात काम
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डार्लिंग्स’ या नेटफ्लिक्सच्या डार्क कॉमेडी-ड्रामामध्ये दिव्याने एका महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांनी मुख्य भूमिका साकारली होती. जसमीत के. रीन दिग्दर्शित या चित्रपटात विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांनीही काम केले होते. हा चित्रपट आलियाचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता. दिव्याने विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्यासोबत २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जलसा’ या थ्रिलर चित्रपटातही काम केले होते.
अभिनयात येण्यापूर्वी दिव्या विनेकर काय करत होत्या?
अभिनयात येण्यापूर्वी, त्यांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये काम केले. अभिनयाव्यतिरिक्त, विनेकर एक डिजिटल कंटेंट क्रिएटर, फ्रीलान्स कंटेंट रायटर आणि कवयित्री देखील होत्या. डिजिटल मार्केटिंगमध्ये जवळपास एक दशक घालवल्यानंतर, त्यांनी २०१८ मध्ये मुख्य प्रवाहातील कला क्षेत्रात प्रवेश केला. तिच्या अचानक झालेल्या निधनाने तिचे मित्र आणि सहकारी यांना धक्का बसला आहे.