Alia Bhatt: रणबीरसोबत ‘असमान नातं’ असल्याच्या चर्चांवर भडकली आलिया भट्ट; थेट म्हणाली..
Alia Bhatt-Ranbir Kapoor: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आणि रणबीर कपूरच्या नात्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टपणे व्यक्त झाली. आलिया नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ही जोडी नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या चित्रपटांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक गोष्टी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. विशेषतः दोघांच्या वैवाहिक नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे अंदाज बांधले जातात. काही नेटकऱ्यांनी तर आलिया आणि रणबीरचं लग्न समानतेवर आधारित नसल्याची टीकाही केली होती. आता या चर्चांवर आलियाने स्पष्ट भूमिका मांडली असून, अशा प्रकारचे अंदाज लावणं आपल्यासाठी अपमानास्पद असल्याचं तिने म्हटलं आहे.
काय म्हणाली आलिया?
आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरसोबतच्या नात्याबद्दल होणाऱ्या चर्चांवर भाष्य केलं. TIME मासिकाच्या TIME100 Next India यादीसाठी झालेल्या संवादात तिने सोशल मीडियावरील टीकेला उत्तर दिलं. “महिलांनी स्वतःचं मन आणि स्वतःच्या भावना ओळखून त्यानुसार निर्णय घ्यावेत, असं मी नेहमी सांगत असते. अशा परिस्थितीत मी एखाद्या असमान नात्यात अडकून त्रास सहन करत असल्याचं लोकांनी गृहीत धरणं अपमानास्पद आहे,” असं आलियाने स्पष्ट केलं.
तिने पुढे रणबीरसोबतच्या नात्याबद्दलही मन मोकळं केलं. कोणत्याही नात्याचा पाया हा एकमेकांना समजून घेण्यात असतो. काहीही न बोलता समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं आणि आपलं म्हणणं ऐकून घ्यावं, अशी भावना महत्त्वाची असते. रणबीरसोबत असताना आपल्याला हीच भावना अनुभवायला मिळते, असं आलियाने सांगितलं.
रणबीरच्या काही वक्तव्यांमुळे झाली होती चर्चा
आलिया आणि रणबीरच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे 2023 मध्ये एका मुलाखतीत आलियाने सांगितलं होतं की, भांडण किंवा वादाच्या वेळी तिने मोठ्या आवाजात बोलणं रणबीरला आवडत नाही. त्यामुळे ती स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या या वक्तव्यानंतर काही नेटकऱ्यांनी ती रणबीरसाठी सतत स्वतःमध्ये बदल करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये आलियाने एका मुलाखतीत रणबीरला तिच्या नैसर्गिक ओठांचा रंग आवडत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे तो तिला लिपस्टिक पुसण्यास सांगायचा, असंही तिने नमूद केलं होतं. या वक्तव्यावरून रणबीरच्या वागण्यावर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित झाले. मात्र, नोव्हेंबर 2023 मध्ये ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात आलियाने रणबीरची बाजू घेत त्याच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं म्हटलं होतं.
जुलै 2024 मध्ये निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये रणबीरने लग्नानंतर दोघांनीही एकमेकांसाठी काही गोष्टींमध्ये बदल आणि तडजोड करणं आवश्यक असल्याचं सांगितलं होतं. त्याने आलियाच्या बोलण्याच्या शैलीत झालेल्या बदलाचाही उल्लेख केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहिक नात्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.