रिलीजपूर्वीच अल्लू अर्जुनच्या ‘राका’ चित्रपटाचा धमाका, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कधी प्रदर्शित होणार?

अल्लू अर्जुनच्या 'राका' चित्रपटाने रिलीजपूर्वीच रचला इतिहास; 37 कलाकारांच्या मोशन-कॅप्चरमुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. कधी प्रदर्शित होणार?

रिलीजपूर्वीच अल्लू अर्जुनच्या ‘राका’ चित्रपटाचा धमाका, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कधी प्रदर्शित होणार?
Raaka
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 21, 2026 | 7:49 PM

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी ‘राका’ (Raaka) या चित्रपटाची चाहत्यांना आतुरता आहे. दिग्दर्शक एटली यांच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चित्रपटाने रिलीजपूर्वीच जागतिक स्तरावर विक्रम केल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सन पिक्चर्स या निर्मिती संस्थेने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर या विक्रमाची माहिती शेअर केली आहे.

37 कलाकारांच्या मोशन-कॅप्चरचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

सन पिक्चर्सच्या माहितीनुसार, ‘राका’ चित्रपटाने रिअल-टाइममध्ये सर्वाधिक लोकांचे मोशन-कॅप्चर करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या विक्रमात एकाच वेळी 37 कलाकारांचे मोशन-कॅप्चर करण्यात आले.

या ऐतिहासिक कामगिरीसाठी अभिनेता अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक एटली यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे.

रिअल-टाइम मोशन-कॅप्चर म्हणजे काय?

रिअल-टाइम मोशन-कॅप्चर ही एक प्रगत तंत्रज्ञान प्रणाली आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक हालचाली आणि हावभाव त्याच वेळी डिजिटल 3D मॉडेल किंवा कॅरेक्टरमध्ये रूपांतरित केले जातात.

या तंत्रज्ञानाचा वापर चित्रपटांमधील व्हिज्युअल इफेक्ट्स, डिजिटल व्यक्तिरेखा आणि अॅक्शन सीन्समध्ये केला जातो. त्यामुळे कलाकारांच्या हालचाली डिजिटल कॅरेक्टरमध्ये अधिक नैसर्गिक पद्धतीने दाखवता येतात.

‘राका’मध्ये दिसणार मोठी स्टारकास्ट

एटली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा ‘राका’ हा सायन्स-फिक्शन अॅक्शन ड्रामा चित्रपट असल्याचं सांगितलं जातं. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, रश्मिका मंदाना, मृणाल ठाकूर, राम्या कृष्णन, जान्हवी कपूर आणि योगी बाबू यांसारखे कलाकार झळकणार असल्याची माहिती आहे.

‘राका’च्या प्रदर्शनाच्या अधिकृत तारखेची अद्याप घोषणा झालेली नसल्याचं दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. मात्र, हा चित्रपट पुढील वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिलीजपूर्वीच मोशन-कॅप्चरच्या विक्रमामुळे ‘राका’ चर्चेत आला असून, अल्लू अर्जुन आणि एटली यांच्या या आगामी चित्रपटाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us