Alpha Caste Fees : आलिया भट्टला बॉबी देओलपेक्षा 316.67% अधिक मानधन; शर्वरीला तर इतकं कमी फी

Alpha Caste Fees : आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेला 'अल्फा' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील कलाकारांना किती मानधन मिळालं याची माहिती समोर आली आहे. शर्वरीला आलियापेक्षा खूपच कमी मानधन मिळाल्याचं कळतंय.

Alpha Caste Fees : आलिया भट्टला बॉबी देओलपेक्षा 316.67% अधिक मानधन; शर्वरीला तर इतकं कमी फी
Alia Bhatt, Sharvari and Bobby Deol
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2026 | 3:18 PM

अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या आगामी ‘अल्फा’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता आहे. यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत बनलेला हा स्पाय थ्रिलर चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील कलाकारांना किती मानधन मिळालं आहे, याची माहिती समोर आली आहे. ‘एशियानेट न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया भट्टला ‘अल्फा’मधील भूमिकेसाठी सर्वाधिक मानधन मिळालं आहे. यामध्ये तिने अॅक्शन पॅक्ड भूमिका साकारली आहे. त्यासाठी तिने बरीच मेहनतसुद्धा घेतली आहे. आलियाला तब्बल 25 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं समजतंय. तर दुसरीकडे शर्वरी वाघने या चित्रपटात एका सुपर एजंटची भूमिका साकारली आहे. त्यासाठी तिला फक्त तीन कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

अभिनेता बॉबी देओललाही ‘अल्फा’मध्ये आलिया भट्टपेक्षा कमी मानधन मिळालं आहे. बॉबीला त्याच्या भूमिकेसाठी सहा कोटी रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय. तर अनिल कपूर यांनासुद्धा तितकीच फी मिळाली आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन एका खास भूमिकेत झळकणार आहे. सिद्धार्थ आनंदच्या ‘वॉर’ आणि अयान मुखर्जीच्या ‘वॉर 2’मध्ये मेजर कबीरची भूमिका साकारलेला हृतिक पुन्हा एकदा त्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याच्या मानधनाविषयीची माहिती अद्याप समोर आली नाही.

पहा ट्रेलर-

‘अल्फा’चा टीझर जून महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. या टीझरच्या सुरुवातीला आलिया भट्ट ही बॉबी देओलसोबत एका हॉटेलमध्ये जेवत असते. त्याच सीनमध्ये बॉबी तिला तिच्या अठराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर तो तिला एक कार्ड देतो, ज्यावर एक रुमनंबर लिहिलेला असतो. तिला आतापर्यंत मिळालेल्या प्रशिक्षणाची परीक्षा देण्याची वेळ आल्याचं तो तिला सांगतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये शर्वरीच्या भूमिकेचीही झलक पहायला मिळाली. तीसुद्धा आलियासोबत अनेक फाइटिंगचे सीन्स करताना दिसली.

‘अल्फा’ हा वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा पहिला महिलाप्रधान चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठान’, ‘टायगर 3’ आणि ‘वॉर 2’ यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले होते. यांमध्ये सलमान खान, शाहरुख खान, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका होता. ‘अल्फा’ हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us