
सध्या बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर ‘धुरंधर 2 : द रिव्हेंज’ची लाट आहे आणि लाटेवर अनेकांना स्वार व्हायचं आहे. एखादा चित्रपट ट्रेंडमध्ये असला की त्याबद्दल अनेकजण सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करताना दिसतात. काहीजण त्या चित्रपटाचं कौतुक करतात, तर काहीजण त्या चित्रपटाचं उदाहरण देऊन इतरांवर निशाणा साधतात. अभिनेत्री अमीषा पटेलसुद्धा असंच काहीसं करताना दिसतेय. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाबद्दल तिने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने नेमका कोणाला टोला लगावला आहे, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. इतकंच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीतील इतर दिग्दर्शकांना तिने आदित्यकडून काही गोष्टी शिकण्याचा सल्ला दिला आहे.
‘डोळे उघडणारा चित्रपट.. इंडस्ट्रीकडून ‘धुरंधर’चं कौतुक होणं चांगली बाब आहे आणि हा ब्रँड त्या सर्व प्रशंसेसाठी पात्र आहे. इंडस्ट्रीने ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की, आदित्यने चित्रपट बनवला आहे, प्रोजेक्ट नाही. त्याने अभिनेत्यांना कास्ट केलं आहे, पार्ट्यांमध्ये ट्रेंड होणाऱ्या इन्स्टाग्रामर्सना नाही. त्यामुळे प्रोजेक्ट्स बनवणं थांबवा आणि चित्रपट बनवणं सुरू करा’, अशा शब्दांत अमीषाने सुनावलं आहे.
Eye opener 👌Industry Praising DHURANDHAR is wow and the brand deserves all the accolades 👏👏industry needs to realise that ADITYA made a film and not a project,,casted actors and not instagrammars who trend at parties 👍stop making projects and and start making films👍
— ameesha patel (@ameesha_patel) March 24, 2026
अमीषाच्या या ट्विटवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘हा टोमणा नेमका कोणाला आहे? पण वाचून छान वाटलं’, असं एका युजरने म्हटलं आहे. तर ‘अमीषा बरोबर बोलली आहे. जेव्हा कथेला प्राधान्य दिलं जातं आणि कास्टिंग योग्य केली जाते, तेव्हा फरक स्पष्ट दिसतो. अधिक चित्रपट आणि कमी प्रोजेक्ट्स.. हे गरजेचं आहे’, असं म्हणत दुसऱ्या युजरने अमीषाच्या मताशी सहमती दर्शविली. ‘जेव्हा तुम्ही अभिनेत्यांना कास्ट करता, तेव्हा तुम्हाला धुरंधरसारखा जादुई चित्रपट मिळतो. जेव्हा तुम्ही इन्फ्लुएन्सर्सना कास्ट करता, तेव्हा तुम्हाला फक्त दोन दिवसांचा ट्रेंड मिळतो’, असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे.
अमीषाने अशा पद्धतीने बॉलिवूड इंडस्ट्रीतील ठराविक लोकांवर निशाणा साधण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने इंडस्ट्रीबाबत बेधडक मतं मांडली आहेत. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहा दिवसांत जगभरात तब्बल 919 कोटी रुपये कमावले आहेत. कमाईचा हा आकडा वेगाने वाढत असून लवकरच हा चित्रपट 1000 कोटी रुपयांचाही टप्पा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.