‘धुरंधर’ पाहिल्यानंतर अक्षय खन्नाचं कौतुक करणाऱ्यांना अभिनेत्रीने झापलं; आंधळी लोकं..

सध्या सर्वत्र 'धुरंधर'चाच बोलबाला पहायला मिळतोय. अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैतच्या भूमिकेची विशेष चर्चा होत आहे. सोशल मीडियावर जो-तो अक्षय खन्नाचं भरभरून कौतुक करत आहे. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्या सर्वांना चांगलंच झापलं आहे.

धुरंधर पाहिल्यानंतर अक्षय खन्नाचं कौतुक करणाऱ्यांना अभिनेत्रीने झापलं; आंधळी लोकं..
Akshaye Khanna
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 16, 2025 | 10:26 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यामध्ये रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात रेहमान डकैतची भूमिका साकारणारा अक्षय रणवीरही भारी पडल्याचं मत प्रेक्षकांनी नोंदवलंय. त्याच्या दमदार अभिनयकौशल्याचं भरभरून कौतुक होत आहे. त्याची एण्ट्री, डान्स, गाणं.. सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा अक्षय खन्नासाठी खास पोस्ट लिहित आहे. इतकंच काय तर अक्षयच्या एक्स गर्लफ्रेंडनेही त्याच्यासोबतचा जुना फोटो पोस्ट करत त्याची प्रशंसा केली. हे सर्व पाहून अक्षयची जवळची मैत्रीण आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने त्या सर्वांना सुनावलं आहे, जे इतक्या वर्षांनंतर आता अक्षयचं कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर ट्रेंड व्हायचं असेल तर अक्षय खन्नाबद्दल बोला आणि तुम्हाला तुमचा चित्रपट हिट करायचा असेल तर अक्षयला भूमिका द्या.. अशा शब्दांत तिने टोला लगावला आहे. इतक्या वर्षांपासून आंधळेपणाने वागणाऱ्यांना आता अक्षय खन्ना दिसू लागला आहे, असंही तिने म्हटलंय.

अमीषा पटेलची पोस्ट-

‘जर तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड व्हायचं असेल तर अक्षय खन्नाबद्दल बोला, जर तुम्हाला तुमचा चित्रपट यशस्वी बनवायचा असेल तर अक्षय खन्नाला घ्या.. अखेर अक्षय नावाच्या ब्रँडने त्या सर्वांचे डोळे उघडले आहेत, जे इतक्या वर्षांपासून आंधळे होतेय. अचानक सर्वांना त्याच्याबद्दलचं त्यांचं हरवलेलं प्रेम पुन्हा सापडल्यासारखं वाटतंय. अक्षु.. तुझ्या परफॉर्मन्सने आणि पीआरशिवाय सर्वांना चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल तुझा अभिमान आहे’, अशा शब्दांत तिने सर्वांना सुनावलं आहे.

अमीषा पटेल ही अक्षयची खूप जवळची मैत्रीण आहे. या दोघांनी ‘हमराज’, ‘आप की खातिर’, ‘रेस 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. अक्षयच्या प्रतिभेला पहिल्यापासून ओळखणाऱ्या अमीषाला आता त्याच्यावरून संधीसाधूपणे वागणाऱ्यांचा राग आला आहे. हा राग तिच्या या पोस्टमधून सहज दिसतोय. अमीषाची ही पोस्ट व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान ‘धुरंधर’ या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.