‘हिंदीवाल्यांची मुजोरी त्वरित थांबली पाहिजे’; मराठी चित्रपटांना हक्काचे शोज परत मिळवण्याची अमेय खोपकरांची मागणी

| Updated on: Aug 12, 2022 | 4:46 PM

बॉलिवूडमधल्या या दोन बड्या कलाकारांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांचे (Marathi Movies) शोज अचानक कमी झाल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

हिंदीवाल्यांची मुजोरी त्वरित थांबली पाहिजे; मराठी चित्रपटांना हक्काचे शोज परत मिळवण्याची अमेय खोपकरांची मागणी
Raksha Bandhan and Laal Singh Chaddha
Image Credit source: Instagram
Follow us on

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. बॉलिवूडमधल्या या दोन बड्या कलाकारांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांचे (Marathi Movies) शोज अचानक कमी झाल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे. लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन या हिंदी चित्रपटांच्या आक्रमणामुळे हे शोज कमी करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे मराठीला हक्काचे शोज परत मिळालेच पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी ट्विटरवर केली आहे. गेल्या दोन आठवड्यात मराठीत ‘टाईमपास 3’, ‘दे धक्का 2’ आणि ‘एकदा काय झालं’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

अमेय खोपकरांचं ट्विट-

‘गेल्या दोन आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास 3, ‘दे धक्का 2’ आणि ‘एकदा काय झालं’ या मराठी चित्रपटांचे शोज अचानक कमी झालेले आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ या हिंदी चित्रपटांच्या आक्रमणामुळे हे शोज कमी करण्यात आले आहेत. ज्याठिकाणी मराठी चित्रपटांना हाऊसफुल्ल गर्दी मिळते तिथूनही हद्दपार करण्यात आलंय. तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का? मोठा वीकेंड आहे म्हणून बॉलिवूडप्रमाणे मराठी चित्रपटांनाही कमाई करायची आहे. हे लक्षात न घेता जी मुजोरी हिंदीवाल्यांनी चालवली आहे ती त्वरित थांबली पाहिजे आणि मराठीला हक्काचे शोज परत मिळालेच पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीसह मोठा वीकेंड आल्याने चित्रपटांची कमाई चांगली होईल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे. त्या दृष्टीने लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी 11 ऑगस्टला रक्षाबंधनच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले. मात्र यामुळे थिएटर्समधील मराठी चित्रपटांचे शोज कमी केल्याची तक्रार केली जात आहे. ‘टाईमपास 3’, ‘एकदा काय झालं’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही त्यांचे शोज कमी का केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आमिर आणि अक्षयच्या या चित्रपटांनी पहिल्या दिवशी मात्र अपेक्षेपेक्षा कमीच कमाई केल्याचं पहायला मिळालं.