उतावीळ लोकंच..; समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर राज निदिमोरूच्या पूर्व पत्नीची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं आहे. या लग्नाच्या चर्चांदरम्यान राजची पूर्व पत्नी श्यामली डे हिनं सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उतावीळ लोकंच..; समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर राज निदिमोरूच्या पूर्व पत्नीची पोस्ट चर्चेत
Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru
Image Credit source: Instagram
Updated on: Dec 01, 2025 | 1:17 PM

अभिनेता नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही काळापासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. आज (1 डिसेंबर 2025) पहाटे कोइंबतूर इथल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात त्यांनी लग्न केल्याचं कळतंय. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते. या लग्नाच्या चर्चांदरम्यान आता राज निदिमोरूची पूर्व पत्नी श्यामली डेनं सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. कोणाचंही नाव न घेतला श्यामलीने तिच्या पोस्टमध्ये ‘उतावीळ लोकां’बद्दल एक मेसेज लिहिला आहे. या पोस्टद्वारे तिने समंथा आणि राज यांनाच टोमणा मारल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

‘उतावीळ लोकंच उतावळेपणाने गोष्टी करतात’, अशा आशयाची पोस्ट श्यामलीने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये श्यामलीने कोणाचाच उल्लेख केला नसला तरी ज्या वेळी तिने ही पोस्ट शेअर केली आहे, त्यावरून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. समंथा आणि राज त्यांच्या नात्याबद्दल कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. परंतु इन्स्टाग्रामवर समंथाने अनेकदा त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. गेल्या महिन्यात जेव्हा समंथाने राजला मिठी मारतानाचा फोटो पोस्ट केला, तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आणखी उधाण आलं होतं.

राज निदिमोरूच्या पूर्व पत्नीची पोस्ट-

समंथा आणि राज यांनी ‘द फॅमिली मॅन 2’ आणि ‘सिटाडेट: हनी बनी’ या वेब सीरिजसाठी एकत्र काम केलं होतं. राजने याआधी सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी लग्न केलं होतं. श्यामलीने राकेश ओमप्रकाश मेहरा आणि विशाल भारद्वाज यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केलंय. तर समंथाने याआधी नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. समंथा घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं.

समंथाला मायोसिटीस नावाच्या ऑटो-इम्युन आजाराचं निदान झालं होतं. यावर उपचार घेताना तिने कामातूनही ब्रेक घेतला होता. राज निदिमोरूने तिरुपती श्री वेंकटेश्वर विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलं. तो दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्मातासुद्धा आहे.