
अमिताभ बच्चन यांच्या ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेला अपघात आजही चित्रपट इतिहासातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक आहे. या घटनेने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण यामागे एक रहस्यमय कहाणीही देखील आहे. कदाचितच कोणाला माहित असेल. हा अपघात होण्याच्या आदल्या दिवशी एका अभिनेत्रीने अमिताभ यांना अचानक मध्यरात्री फोन करून त्यांच्या तब्येतीबद्दल विचारलं. खरंच दुसऱ्या दिवशी अमिताभ हे आयसीयूमध्ये होते. हा प्रसंग अमिताभ बच्चन यांनी स्वत: सांगितला होता.
अभिनेत्रीला अमिताभ यांच्याबद्दल पडलेलं ते स्वप्न
ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील. स्मिता यांना एक स्वप्न पडले होते. ‘कुली’ चित्रपटाचे शूटिंग बंगळुरूमध्ये सुरू होते. 26 जुलै 1982 च्या एक दिवस आधी स्मिता पाटील यांना एक भयानक स्वप्न पडले, ज्यामध्ये त्यांनी सेटवर अमिताभ बच्चन यांना गंभीर जखमी झालेले पाहिलं. या स्वप्नाने त्रस्त झालेल्या स्मिता पाटील यांनी ताबडतोब अमिताभ यांना फोन केला आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. तेव्हा अमिताभ हसत म्हणाले की हो ते पूर्णपणे ठीक आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही. पण नियतीने कदाचित वेगळेच काहीतरी ठरवले होते.
अन् सेटवर खरंच अमिताभ यांचा अपघात झाला
अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, ‘मी बंगळुरूमध्ये ‘कुली’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. रात्री उशिरा 2 वाजताच्या सुमारास मला माझ्या हॉटेलच्या खोलीत एक फोन आला. रिसेप्शनिस्टने मला सांगितले की स्मिता पाटील आहे. मी तिच्याशी अशा वेळी कधीच बोललो नव्हतो म्हणून मला धक्का बसला. हा फोन महत्त्वाचा असावा असे वाटून मी फोन उचलला. स्मिताने मला विचारले की ,मी ठीक आहे का?. मी हो असं उत्तर दिलं आणि तिने सांगितले की तिला माझ्याबद्दल एक वाईट स्वप्न पडलं आणि म्हणूनच तिने रात्री इतक्या उशिरा फोन केला. आणि दुसऱ्या दिवशी माझा अपघात झाला.’
अपघातामुळे अमिताभ यांची प्रकृती गंभीर होती
दुसऱ्याच दिवशी 26 जुलै 1982 रोजी, पुनीत इस्सरसोबत एका फायटींगच्या दृश्याचे चित्रीकरणवेळी करताना अमिताभ गंभीर जखमी झाले. त्या दृश्यात पुनीत अमिताभच्या पोटात ठोसा मारणार होते पण प्रत्यक्षात तो जोरदार धक्का ठरला. या अपघातामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना ताबडतोब ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. देशभरातील चाहत्यांनी त्यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थनाही केली.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्यावेळी 21 कोटी कमावले
‘कुली’ प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आणि अपघाताचा सीन देखील चित्रपटात समाविष्ट करण्यात आला. कुली चित्रपटाचे बजेट सुमारे 3.5 कोटी रुपये होते तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्यावेळी 21 कोटी कमावले. पण स्मिता पाटील यांचे ते स्वप्न अजूनही चर्चेचा विषय आहे. कारण काही जण ते योगायोग मानतात तर काही जण ते पूर्वसूचना. अमिताभ देखील तो फोन कधीही विसरू शकले नाही.