या गाण्यात एकच शब्द 65 वेळा वापरला, तरीही गाणं ठरलं सुपरहिट, 35 वर्षानंतरही क्रेझ कायम
अमिताभ बच्चन यांचं हे गाणं जे बनवलं अग्निपथसाठी पण वापरलं दुसऱ्याच चित्रपटात. बनवण्यासाठी लागले होते 15 दिवस. या गाण्यात एकच शब्द 65 वेळा वापरण्यात आला होता. तरी देखील ठरलं प्रचंड सुपरहिट.

बॉलिवूडमधील काही गाणी अशी आहेत, जी प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन आणि किमी काटकर यांच्या ‘हम’ या चित्रपटातील ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे गाणं त्यापैकीच एक आहे. आजही पार्टी, लग्नसमारंभ आणि डान्स फ्लोअरवर हे गाणं वाजले की प्रत्येकजण ठेका धरताना दिसतो.
अमिताभ बच्चन आणि किमी काटकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याला सुदेश भोसले आणि कविता कृष्णमूर्ती यांनी आवाज दिला आहे. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या गाण्याला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले आहे. या गाण्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यातील ‘चुम्मा’ हा शब्द. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण गाण्यात ‘चुम्मा’ हा शब्द तब्बल 65 वेळा ऐकायला मिळतो.
गाण्याच्या शूटिंगदरम्यान किमी काटकर जखमी
‘जुम्मा चुम्मा दे दे’ची शूटिंगही आव्हानात्मक होती. रिपोर्ट्सनुसार, या गाण्याच्या शूटिंगला तब्बल 15 दिवस लागले होते. शूटिंगदरम्यान एका प्रसंगात पाण्याच्या जोरदार दाबामुळे किमी काटकर टेबलापासून जवळपास 20 फूट दूर जाऊन पडल्या होत्या. या घटनेत त्यांना दुखापत झाल्याने काही काळ शूटिंग थांबवण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा शूटिंग करून गाणे पूर्ण केले.
आधी ‘अग्निपथ’साठी लिहिले होते गाणे?
‘जुम्मा चुम्मा दे दे’बाबत आणखी एक रंजक माहिती समोर येते. रिपोर्टनुसार, हे गाणे सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ चित्रपटासाठी लिहिण्यात आले होते. मात्र नंतर ते ‘हम’ चित्रपटात वापरण्यात आले आणि प्रचंड लोकप्रिय झाले.
मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत रजनीकांत, गोविंदा, किमी काटकर, दीपिका साही, शिल्पा शिरोडकर आणि डॅनी डेन्झोंगपा यांसारखे कलाकार झळकले होते.
‘हम’नेही केली होती दमदार कमाई
‘जुम्मा चुम्मा दे दे’च्या लोकप्रियतेसोबतच ‘हम’ चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. उपलब्ध माहितीनुसार, चित्रपटाने भारतात सुमारे 9.25 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केला होता आणि 1991 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये त्याचा समावेश होता.
चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल 35 वर्षे झाली असली तरी ‘जुम्मा चुम्मा दे दे’ची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांचा भन्नाट डान्स, किमी काटकर यांचा ग्लॅमरस अंदाज आणि लक्षात राहणारा हुक यामुळे हे गाणे आजही बॉलिवूडच्या लोकप्रिय डान्स नंबर्सपैकी एक मानले जाते.