अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर भडकले ऐश्वर्या रायचे चाहते; म्हणाले ‘तुमच्या सुनेकडे असं दुर्लक्ष..’

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटमुळे ऐश्वर्या रायचे चाहते नाराज झाले आहेत. 'बंटी और बबली' या चित्रपटातील 'कजरा रे' गाण्याविषयी बिग बींनी हे ट्विट केलं होतं. मात्र त्यात त्यांनी सून ऐश्वर्याचा उल्लेखच केला नाही.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर भडकले ऐश्वर्या रायचे चाहते; म्हणाले तुमच्या सुनेकडे असं दुर्लक्ष..
Aishwarya Rai and Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 30, 2024 | 11:12 AM

अभिनेता अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली’ हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या तिघांनी एकत्र डान्स केला होता. या तिघांवर चित्रित झालेलं ‘कजरा रे’ हे गाणं त्यावेळी तुफान गाजलं होतं. आजही या गाण्याची लोकप्रियता तितकीच आहे. चित्रपटप्रेमींना या गाण्याचे बोल, डान्सचे स्टेप्स सर्वकाही लक्षात असतील. या चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिग बींनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. मात्र या पोस्टमध्ये त्यांनी सून ऐश्वर्याचा उल्लेखसुद्धा न केल्याने चाहते भडकले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

‘कजरा रे’ या गाण्यासंदर्भातील एक ट्विट अमिताभ बच्चन यांनी रिट्विट केलं. ‘अभिषेक बच्चन, बंटी और बबली चित्रपटाचे 19 वर्षे पूर्ण’, अशी ही पोस्ट होती. या पोस्टला रिट्विट करत बिग बींनी लिहिलं, ‘हे गाणं इतकं लोकप्रिय झालं होतं की आजसुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं. या गाण्यावर आजही प्रेमाचा वर्षाव होतो. या गाण्यातील सर्वांत चांगला क्षण तो होता, जेव्हा आम्ही त्यावर स्टेजवर लाइव्ह परफॉर्म केलं होतं.’ त्यांच्या या ट्विटवर ऐश्वर्याचे चाहते नाराज झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

‘कजरा रे हे गाणं पूर्णपणे ऐश्वर्या रायवरच चित्रित करण्यात आलं होतं. तुम्ही दोघं त्यात सपोर्टिंग डान्सर होते’, असं एकाने लिहिलं. तर ‘या गाण्यात ऐश्वर्यासुद्धा होती. तुम्ही तिला टॅग का नाही केलं? तुम्ही तिच्याकडे का दुर्लक्ष करत आहात’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘तुम्ही आणि तुमचं कुटुंब ऐश्वर्याला अशा पद्धतीने बाजूला करत असल्याचं पाहून खूप वाईट वाटतं’, अशीही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. ‘कजरा रे हे गाणं तुमच्या सुनेमुळे प्रसिद्ध झालं होतं’, असंही एका युजरने लिहिलं आहे.

ऐश्वर्या आणि तिच्या सासरच्या कुटुंबीयांचं नातं गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. मध्यंतरीच्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघं एकमेकांना घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र त्यावर बच्चन कुटुंबीयांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. ऐश्वर्याने नुकतीच तिच्या मुलीसोबत ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला हजेरी लावली होती.