ब्रॅड पिटच्या मुलाचा भीषण अपघात; प्रत्यक्षदर्शींना वाटलं ‘जागीच झाला मृत्यू’
कोट्यवधी संपत्तीचे मालक असणारे प्रसिद्ध हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांच्या मुलाचा सोमवारी भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. हा अपघात इतका भीषण होता की प्रत्यक्षदर्शींना वाटलं, त्याचा जागीच मृत्यू झाला.
हॉलिवूड स्टार अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचा मुलगा पॅक्स जोली पिटचा सोमवारी गंभीर अपघात झाला. लॉस एंजिलिसमध्ये झालेल्या या अपघातात पॅक्सच्या डोक्याला जबर मार लागला. पॅक्स रस्त्यावर त्याची इलेक्ट्रिक सायकल चालवत होता आणि अचानक त्याच्या सायकलची एका कारला धडक लागली. रस्त्यावरील ट्रॅफिक लाइटजवळ येताच पॅक्सचा त्याच्या इलेक्ट्रिक सायकलवरून ताबा सुटला आणि चौकात थांबलेल्या एका कारला तो मागून धडकला, अशी माहिती ‘टीएमझेड’ने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पॅक्सने इलेक्ट्रिक सायकल चालवताना हेल्मेट घातलं नव्हतं. ज्या कारला त्याने धडक दिली, त्या कारचालकाने तातडीने पॅक्सकडे धाव घेतली. या अपघातात पॅक्सच्या पाठीला आणि डोक्याला जबर मार लागला. त्याला लॉस एंजिलिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पॅक्सच्या मेंदूतून रक्तस्राव झाल्याची भीती सुरुवातीला डॉक्टरांना होती, मात्र त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळतंय.
View this post on Instagram
या अपघाताची तीव्रता इतकी होती की त्यावेळी रस्त्यावर असलेल्या प्रत्यक्षदर्शींना वाटलं होतं की पॅक्सचा जागीच मृत्यू झाला असेल. कारला धडकल्यानंतर पॅक्स रस्त्यावर कोसळला आणि कोणतीच हालचाल करत नव्हता. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची भीती प्रत्यक्षदर्शींना होती. जेव्हा पॅरामेडिक्स अपघातस्थळी पोहोचलं, तेव्हाच पॅक्स शुद्धीवर आला. पॅक्सची आई आणि प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिनाच्या घराजवळच लॉस फेलिझ बोलव्हार्ड याठिकाणी हे पॅरामेडिक्स होतं. अँजेलिनाला अपघाताची माहिती मिळताच तिने तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली.
पॅक्स हा अँजेलिना आणि ब्रॅड यांचा चौथा मुलगा असून तो 20 वर्षांचा आहे. त्याला अनेकदा लॉस एंजिलिसमधील रस्त्यांवर त्याची BMX स्टाइलची इलेक्ट्रिक बाइक चालवताना पाहिलं गेलंय. पॅक्सने ‘कुंग फू पांडा 3’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी आपला आवाज दिला आहे. त्याचप्रमाणे त्याने अँजेलिनाच्या प्रसिद्ध ‘मेलीफिसंट’ या चित्रपटातही छोटीशी भूमिका साकारली होती. अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या घटस्फोटाची केस सुरू असून त्यांना सहा मुलं आहेत. पॅक्सशिवाय त्यांना मॅडॉक्स, झहारा, शिलो आणि नॉक्स – विवियेना ही जुळी मुलं आहेत.