Anirudh Ravichander-Kavya Maran Wedding: अनिरुद्ध-काव्या मारनच्या लग्नात रजनीकांत यांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
अनिरुद्ध हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा संगीतकार असून त्याने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. तर काव्या मारन या सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ आणि सहमालकीण आहेत. या दोघांच्या लग्नामुळे मनोरंजन आणि उद्योगविश्वातील दोन मोठ्या कुटुंबांची चर्चा रंगली आहे.

Anirudh Ravichander-Kavya Maran Wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालकीण काव्या मारन यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 11 नोव्हेंबर 2026 रोजी ग्रीसमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या शाही डेस्टिनेशन वेडिंगला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र, या लग्नसोहळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते सुपरस्टार रजनीकांत यांनी. अनिरुद्धच्या लग्नात रजनीकांत यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अनिरुद्धच्या गाण्यावर थिरकले रजनीकांत
अनिरुद्ध आणि काव्या यांच्या लग्नसोहळ्यातील एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत ‘मनसिलायो’ या सुपरहिट गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे गाणं अनिरुद्धनेच संगीतबद्ध केलं आहे. रजनीकांत यांच्या ‘वेट्टैयन’ या चित्रपटातील हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड लोकप्रिय झालं होतं. लग्नाच्या आनंदी वातावरणात रजनीकांत यांनी नवविवाहित जोडप्यासोबत आणि मारन कुटुंबीयांसोबत डान्सचा आनंद लुटला.
या व्हिडीओमध्ये रजनीकांत यांचा उत्साह आणि एनर्जी पाहून चाहते भारावून गेले आहेत. वयाच्या 75 व्या वर्षीही त्यांचा उत्साह कायम असल्याचं म्हणत चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रजनीकांत यांचं हे रूप चाहत्यांना विशेष आवडलं आहे. रजनीकांत आणि अनिरुद्ध यांचं नातं केवळ चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित नाही. अनिरुद्ध हा रजनीकांत यांचा पुतणा आहे. रजनीकांत यांची पत्नी लता या अनिरुद्धच्या मावशी आहेत. त्यामुळे पुतण्याच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी रजनीकांत पत्नी लता आणि मुलगी ऐश्वर्यासोबत ग्रीसला पोहोचले होते. चेन्नई विमानतळावरून रवाना होत असतानाचे त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पहा व्हिडीओ-
या लग्नसोहळ्याला तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 10 नोव्हेंबरपासून लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. पारंपरिक तमिळ पद्धतीने निक्चयार्थम अर्थात साखरपुड्याचा विधी पार पडल्यानंतर 11 नोव्हेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली.
अनिरुद्धने शेअर केले लग्नाचे खास फोटो
अनिरुद्धने सोशल मीडियावर लग्नाचे पहिले फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. ‘माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम, आयुष्यभरासाठी…’ अशा अर्थाचं ‘My once in a lifetime, for a lifetime 11.11’ असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. लग्नासाठी काव्याने आकर्षक तपकिरी रंगाचा डिझायनर पोशाख परिधान केला होता. तर अनिरुद्धने क्रीम रंगाचं जॅकेट आणि त्यावर हटके एम्ब्रॉयडरी असलेला लूक निवडला होता.
२१ नोव्हेंबरला चेन्नईत होणार ग्रँड रिसेप्शन
ग्रीसमध्ये मोजक्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केल्यानंतर आता अनिरुद्ध आणि काव्या चेन्नईमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी हा सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला राजकारण, मनोरंजन आणि उद्योगविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.