“ती थेट सुशांतच्या मिठीत, मी खूप पझेसिव्ह होती”; अंकिता लोखंडेनं सांगितला ‘झलक दिखला जा’मधील किस्सा

‘बिग बॉस 17’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यापासून अभिनेत्री अंकिता लोखंडेनं अनेकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला. आता नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अंकिता पुन्हा एकदा सुशांतबद्दल बोलताना दिसली.

ती थेट सुशांतच्या मिठीत, मी खूप पझेसिव्ह होती; अंकिता लोखंडेनं सांगितला झलक दिखला जामधील किस्सा
Ankita Lokhande and Sushant Singh Rajput
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 04, 2023 | 10:42 AM

मुंबई : 4 डिसेंबर 2023 | अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस 17’मध्ये अनेकदा एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी बोलताना दिसली. त्याच्यासोबत तिचं नातं कसं होतं, ब्रेकअप कशामुळे झालं या सर्वांविषयी ती बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांसमोर मोकळेपणे व्यक्त झाली. आता नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये ती पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणींना उजाळा देताना दिसली. सुशांतसोबत ‘झलक दिखला जा 4’मध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तेव्हाचा काळ कसा होता, कोणत्या गोष्टींमुळे तिच्या मनात सुशांतविषयी ईर्षा निर्माण झाली, याविषयीचा तिने खुलासा केला.

‘बिग बॉस 17’च्या लाइव्ह फिडमध्ये ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यासोबत बसून अंकिता गप्पा मारताना दिसली. ती त्यांना म्हणाली, “झलक दिखला जा या शोमध्ये मी टॉप 5 स्पर्धकांपैकी एक होती. पण तरीसुद्धा त्या शोमध्ये मी माझं लक्ष केंद्रीत करू शकले नाही. मी बाहेर चालायला जायचे. मी निशांतलाही (निशांत भट्ट, झलक दिखला जा मधील कोरिओग्राफर) हेच सांगायचे की स्पर्धेबद्दल तू विसर आणि माझ्यासोबत चालायला ये.”

सुशांतबद्दल काय म्हणाली अंकिता?

या गप्पांदरम्यान अभिषेकने अंकिताला सुशांतविषयी विचारलं. “तो (सुशांत) कुठपर्यंत पोहोचला होता?” त्यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली, “तो टॉप 2 मध्ये होता. मी त्याला म्हटलं होतं की, तू हार. तू जिंकलास तर खूप मोठी समस्या होईल. त्याला जेव्हा पहिल्यांदा 30 गुण मिळाले, तेव्हा मला खूप ईर्षा निर्माण झाली. त्याला पूर्ण गुण कसे मिळाले, असा प्रश्न मला पडायचा.”

हे ऐकल्यानंतर ईशाने अंकिताला सुशांतच्या डान्स पार्टनरविषयी विचारलं. झलक दिखला जा या शोमध्ये सुशांतचा डान्स पार्टनर कोण होता, असा सवाल तिने केला. त्यावर अंकिता पुढे म्हणाली, “ती खूप चांगली डान्सर होती. एकदा डान्स करताना तिने अचानक सुशांतवर उडी मारली, ती थेट त्याच्या मिठीतच जाऊन बसली. त्यावेळी मी खूप पझेसिव्ह होते. आता मी थोडी ठीक झाले आहे. आता मी नॉर्मल झाले आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून मला खूप राग यायचा.”

झलक दिखला जा या शोमध्ये सुशांत आणि कोरिओग्राफर शाम्पा यांची जोडी होती. या शोमध्ये सुशांत आणि अंकिता दोघं टॉप स्पर्धकांमध्ये होते. झी टीव्हीच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम करताना हे दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. काही वर्षे डेट केल्यानंतर 2016 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. तर 2020 मध्ये सुशांत त्याच्या मुंबईतल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती.