अंकुश चौधरीच्या पत्नीचं मालिकेत जबरदस्त कमबॅक; साकारणार ही भूमिका

ही कथा आहे शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबांची. एका प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबांमध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला आणि त्या जखमांनी काही कठोर निर्णयांना जन्म दिला. आपल्या मुलांनी प्रेमविवाह करायचा नाही, तर आई-वडिलांच्या पसंतीनेच लग्न करायचं असा नियम घरात ठरवला जातो.

अंकुश चौधरीच्या पत्नीचं मालिकेत जबरदस्त कमबॅक; साकारणार ही भूमिका
अंकुश चौधरी आणि त्याची पत्नी दीपा परब
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2026 | 12:59 PM

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब तब्बल अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीच्या आगामी ‘सुना येती घरा’ मालिकेत ती ‘उमावती’ ही अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कुटुंबातील प्रत्येक नात्याला जपणारी, प्रसंगी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांच्या आनंदाला प्राधान्य देणारी आणि घराला एकत्र ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणारी उमावती ही व्यक्तिरेखा मालिकेचा भावनिक आधारस्तंभ ठरणार आहे.

उमावतीचं आयुष्य म्हणजे संघर्ष, त्याग आणि नात्यांवरील निस्सीम प्रेम यांचा सुंदर संगम. श्रीमंतीत वाढलेली असली तरी शिवनाथसोबत तिने शून्यातून संसार उभा केला. आयुष्यात आलेल्या प्रत्येक चढ-उतारात ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. शिवनाथचा स्वभाव तापट असला तरी त्याच्या रागामागचं प्रेम आणि जबाबदारी ती ओळखते. त्यामुळेच त्याच्या प्रत्येक कठोर निर्णयाला समजुतीची आणि प्रेमाची किनार देण्याचं काम ती करते.

मुलांसाठी ती आईपेक्षा जास्त एक मैत्रीण आहे. त्यांच्या चुका समजून घेणारी, त्यांना योग्य मार्ग दाखवणारी आणि वडिलांचा दृष्टिकोन समजावून सांगणारी उमावती घरातील नात्यांना जोडून ठेवते. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे घरातील तणावाचे प्रसंगही अनेकदा हलके-फुलके होतात. मात्र या हसऱ्या चेहऱ्यामागे एक वेदना दडलेली आहे. आईपासून दूर राहण्याची खंत आणि मोठ्या बहिणीसोबतचं तुटलेलं नातं पुन्हा जुळण्याची आस तिच्या मनात कायम आहे. माहेरच्या घरावरचं प्रेम ती आजही विसरलेली नाही. दोन्ही कुटुंबांमधील दुरावा मिटून पुन्हा सगळे एकत्र यावेत, हेच तिचं स्वप्न आहे.

पहा मालिकेचा प्रोमो-

उमावती ही केवळ एक गृहिणी नाही, तर नात्यांना जपणारी, माणसांना जोडणारी आणि कुटुंबाला एकत्र ठेवणारी शक्ती आहे. दीपा परबच्या प्रभावी अभिनयामुळे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल यात शंका नाही. ‘सुना येती घरा’ ही नवी मालिका संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नाती जपणं जितकं सुंदर, तितकंच कठीणही असतं. प्रत्येक नव्या नात्यासोबत येतात नव्या अपेक्षा, नवे विचार आणि नव्या स्वप्नांची चाहूल. अशाच नात्यांच्या अनोख्या गुंफणीची गोष्ट या मालिकेत पहायला मिळणार आहे. ही मालिका दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची आणि नव्या नात्यांनी घडणाऱ्या बदलांची कथा उलगडणार आहे.

Follow Us