
प्रसिद्ध गायक, संगीतकार ए. आर. रेहमान हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीच्या सध्याच्या स्थितीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. यावेळी त्यांनी विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटावर ‘विभाजनकारी’ असल्याची टिप्पणी केली. विशेष म्हणजे या चित्रपटाची गाणी रेहमान यांनीच संगीतबद्ध केली होती. ‘छावा’ या चित्रपटाचा विषय शौर्याबद्दल असला तरी तो फूट पाडणारा असल्याचं मत त्यांनी यावेळी नोंदवलं. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. ‘छावा’मध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई भोसले यांची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती.
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत रेहमान म्हणाले, “हा एक फूट पाडणारा चित्रपट आहे. त्याच्या कथेचा गाभा शौर्य दाखवण्याचा असला तरी मला वाटतं की फूट पाडण्याच्या गोष्टीमुळे चित्रपटाला अधिक फायदा झाला. मी दिग्दर्शकांना विचारलं होतं की त्यांना या चित्रपटासाठी माझी गरज का आहे? तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की, आम्हाला या चित्रपटासाठी फक्त तुमची गरज आहे. चित्रपट चांगला असला तरी निश्चितच लोक त्यापेक्षा हुशार आहेत. तुम्हाला असं वाटतं का की लोक चित्रपट पाहून प्रभावित होतील? माझ्या मते लोकांकडे अंतर्गत विवेक नावाची काहीतरी गोष्ट असते, जी सत्य काय आहे आणि फेरफार काय आहे, यातील फरक जाणतो.”
‘छावा’तील गाणी संगीतबद्ध करण्याच्या अनुभवाविषयी ते पुढे म्हणाले, “छावा हे सर्वाधिक प्रेम मिळालेलं पात्र आहे. जणू काही हे प्रत्येक मराठाचं रक्त आहे. चित्रपट संपल्यानंतर तुम्ही एका मुलीला कविता म्हणताना ऐकता. ते खरंच हृदयाला भिडणारं आहे. प्रत्येक मराठा व्यक्तीचा आत्मा असलेल्या या संपूर्ण चित्रपटातील गाणी संगीतबद्ध करणं हा माझा सन्मान आहे. प्रेक्षकांना चांगल्या किंवा वाईट चित्रपटाबद्दल समज असते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला लोकांबद्दल खूप आदर आहे. ते इतके मूर्ख नाहीत की खोट्या माहितीने लगेच प्रभावित होतील. माझा मानवतेवर विश्वास आहे. लोकांकडे विवेक, प्रेम, करुणा असते.”
“देव आपल्यासारख्या लोकांना अधिक शक्ती देतोय, जेणेकरून आपण आपल्या शब्द, कृती आणि कलेद्वारे वाईटाची जागा चांगल्याने घेऊ शकतो. कलेचा वापर सकारात्मक बदलासाठी करणं महत्त्वाचं आहे. काही चित्रपट वाईट हेतूने बनवले जातात. मी ते चित्रपट टाळण्याचा प्रयत्न करतो”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.