ए. आर. रेहमान यांच्यावर भडकले नेटकरी; म्हणाले “संपूर्ण फिल्म इंडस्ट्री कुजलीये”

ए. आर. रेहमान यांच्यावर सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. रामचरण आणि जान्हवी कपूरच्या 'पेड्डा' या चित्रपटाशी संबंधित हे प्रकरण आहे. या चित्रपटातील एका गाण्यासाठी त्यांनी लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या कोरिओग्राफरसोबत काम केलंय.

ए. आर. रेहमान यांच्यावर भडकले नेटकरी; म्हणाले संपूर्ण फिल्म इंडस्ट्री कुजलीये
A R Rahman
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2025 | 8:32 PM

संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान शक्यतो वादांपासून दूरच राहतात. पण सध्या ते त्यांच्या एका कोलॅबरेशनमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. साऊथ सुपरस्टार रामचरणच्या ‘पेड्डी’ या चित्रपटातील एका गाण्याला त्यांनी संगीतबद्ध केलंय. या गाण्याची कोरिओग्राफी जानी मास्टरने केली असून रामचरणची हुक स्टेप चांगलीच व्हायरल होत आहे. परंतु जानी मास्टरवर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ए. आर. रेहमान यांच्यावर जोरदार टीका होत आहे. रेहमान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जानी मास्टरसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. रामचरण आणि जान्हवी कपूरच्या ‘पेड्डी’ चित्रपटातील ‘चिकिरी चिकिरी’ या गाण्यासाठी दोघांनी एकत्र काम केलं आहे. पॉक्सोचा आरोप असलेल्या कोरिओग्राफरसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रेहमानचे चाहते त्यांच्यावर संतापले आहेत.

गाण्याच्या रिलीजच्या एक दिवस आधी जानी मास्टरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ए. आर. रेहमान आणि दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. ‘आम्ही दिग्गज ए. आर. रेहमान सरांची गाणी पाहत आणि त्यावर नाचत मोठे झालो. मला विश्वास बसत नाही की मी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोवरून नेटकऱ्यांनी रेहमान यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. जानी मास्टरसोबत काम करण्याचा निर्णय घेणाऱ्या रेहमान यांच्यावर अनेक चाहते नाराज आहेत. ‘फिल्म इंडस्ट्रीला जानी मास्टरने केलेल्या कृत्याची अजिबात पर्वा नाही. अलीकडेच मारी सेल्वराज आणि निवास यांनी सर्व आरोपांना न जुमानता जानी मास्टरसोबत काम केलं. त्यासाठी कोणीही त्यांना फटकारलं नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘संपूर्ण फिल्म इंडस्ट्री कुजलेली आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘पोक्सोच्या आरोपांमुळे जानी मास्टरला डान्सर्स असोसिएशनमधून काढून टाकण्यात आलं होतं ना? मग त्याला कामाच्या संधी कशा मिळत आहेत’, असा सवालही नेटकऱ्यांनी केला आहे.

सप्टेंबर 2024 मध्ये कोरिओग्राफर शेख जानी बाशाला गोव्यातून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर एका ज्युनियर कोरिओग्राफरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. सुरुवातीला त्याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता. नंतर पीडित महिलेवर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार झाला तेव्हा ती अल्पवयीन होती असं समजल्यावर या प्रकरणात पोक्सो कायद्याचे कलम जोडण्यात आले. नंतर जानी मास्टरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.