‘स्त्री 2’च्या कोरिओग्राफरला अटक; तरुणीवर सहा वर्षांपासून लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
रजनीकांत, चिरंजीवी, ज्युनिअर एनटीआर यांसारख्या साऊथ सुपरस्टार्ससोबतच सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्यांसोबत काम केलेला प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप आहे.
तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर शेक जानी बाशाला आज (गुरुवार) गोव्यातून अटक करण्यात आली. सायबराबाद स्पेशल ऑपरेशन्स टीमकडून (SOT) ही कारवाई करण्यात आली. कोरिओग्राफर शेक जानी बाशा हा तेलुगू आणि हिंदी सिनेसृष्टीत जानी मास्टर म्हणून ओळखला जातो. 21 वर्षीय तरुणीने त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोव्यातून अटक झालेल्या जानी मास्टरला हैदराबादला आणण्यात आलं असून त्याला लवकरच हैदराबाद न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. जानी मास्टर हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता कोरिओग्राफर आहे.
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सायबराबाद आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या नरसिंगी पोलिसांनी बुधवारी 18 सप्टेंबर रोजी जानी मास्टरविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गेल्या सहा वर्षांत आऊटडोअर शूटिंग आणि तिच्या निवासस्थानी जानी मास्टरने सतत लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार त्याच्या ज्युनिअर कोरिओग्राफरने दाखल केली होती. यासोबतच पीडित तरुणीने संपूर्ण प्रकरणाचं तपशीलवार वर्णन करणारे 40 पानी हस्तलिखित दस्तऐवजदेखील तेलंगणा राज्य महिला आयोगाकडे सादर केले आहेत. पीडित तरुणी 16 वर्षांची असल्यापासून जानी मास्टर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता, हे समजल्यावर पोलिसांनी एफआयआरमध्ये पॉक्सो कलम जोडले. समितीच्या अध्यक्षा नेरेला शारदा यांनी बुधवारी माध्यमांना सांगितलं की, आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप करून तक्रारदाराला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश जारी केले आहेत.
साऊथसोबतच हिंदीतही केलंय काम
जानी मास्टर हा हिंदी आणि दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. त्याने नुकतीच श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटातील ‘आई नहीं’ या सुपरहिट गाण्याची कोरिओग्राफी केली होती. त्याचप्रमाणे तो अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा जवळचा सहकारी असल्याचं म्हटलं जातंय. लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनंतर त्याला आता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगितलं गेलंय. जानी मास्तरने रजनीकांत, थलपती विजय, विजय देवरकोंडा, ज्युनिअर एनटीआर, अल्लू अर्जुन, सलमान खान, अक्षय कुमार, सारा अली खान, प्रभूदेवा, शाहिद कपूर, रामचरण, चिरंजीवी, फहाद फासिल यांसारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलंय.