अरबाजकडे परत जाण्याचा मार्ग..; ब्रेकअपनंतर जॉर्जियाने मान्य केली मोठी गोष्ट

मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेता अरबाज खान हा त्याच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. जवळपास चार वर्षे डेट केल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. आता या ब्रेकअपविषयी अरबाजची एक्स गर्लफ्रेंड मोकळेपणे व्यक्त झाली.

अरबाजकडे परत जाण्याचा मार्ग..; ब्रेकअपनंतर जॉर्जियाने मान्य केली मोठी गोष्ट
Giorgia Andriani and Arbaaz Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 12, 2023 | 8:51 AM

मुंबई : 12 डिसेंबर 2023 | जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता-निर्माता अरबाज खान आणि मॉडेल जॉर्जिया अँड्रियांनी यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्जियाने ब्रेकअपचा खुलासा केला होता. दीड वर्षापूर्वीच आमचे मार्ग वेगळे झाले, असं तिने सांगितलं. ब्रेकअपनंतरही मनात अरबाजसाठी भावना असल्याची कबुली जॉर्जियाने या मुलाखतीत दिली होती. मात्र आता पुन्हा त्याच्याकडे जाण्याचा कोणताच मार्ग नाही, असंही तिने म्हटलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्जिया पुन्हा एकदा अरबाजसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

‘टाइम्स न्यूज नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जिया म्हणाली, “चार वर्षांपर्यंत आम्ही रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे साहजिकच मला त्याची आठवण येते. आम्ही चांगले मित्र आहोत. पण गर्लफ्रेंड म्हणून त्याच्याकडे परतणं आता शक्य नाही. लोकांनी मला अरबाजची गर्लफ्रेंड म्हणून बोलवावं, अशी माझी अजिबात इच्छा नाही. माझं स्वतंत्र अस्तित्व आहे.” याआधी दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्जियाने ब्रेकअपनंतरही अरबाजशी संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं होतं. “मला माझ्या आयुष्याच्या ज्या टप्प्यात भावनिक साथ गरजेची होती, त्यावेळी त्याने माझी खूप मदत केली. त्यामुळे माझ्या मनात त्याच्यासाठी काहीच वितुष्ट नाही. मी त्याच्याशी संपर्क का तोडेन?”, असा सवाल तिने केला होता.

जॉर्जिया पुढे असंही म्हणाली की अरबाजसोबतचं तिचं नातं हे एका बुडबुड्यासारखं होतं. जिथे सर्वकाही चांगलं आणि प्रत्येकजण उत्तम होते. मात्र या नात्यातून बाहेर पडल्यानंतर तिला समजलं की खऱ्या आयुष्यात अशा पद्धतीने काम नाही चालत. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जिया म्हणाली होती की तिला आणि अरबाजला या गोष्टीची जाणीव खूप आधीपासूनच होती की त्यांचं नातं फार काळ टिकणार नाही. मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज जॉर्जियाला डेट करू लागला होता.

अरबाज आणि जॉर्जिया हे 2017 पासून एकमेकांना डेट करू लागले होते. अरबाजने मलायकाला 2017 मध्येच घटस्फोट दिला होता. मलायका आणि अरबाजला अरहान खान हा मुलगा आहे. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय.