
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि कलाकार चिन्मय मांडलेकर यांच्या लेखणीतून साकार झालेली ‘अशोक मा.मा.’ ही मालिका मजेदार, खुमासदार कथेमुळे चर्चेत राहिली. या मालिकेत अशोक सराफ यांच्यासह ‘कलर्स मराठी’च्या ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली रसिका वखारकर, नेहा शितोळे, चैत्राली गुप्ते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. केदार वैद्य दिग्दर्शित या मालिकेचा प्रवास आता संपुष्टात आला आहे. यानिमित्त अभिनेत्री रसिका वखारकरने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे.
‘आणि अखेर आम्ही इथवर येऊन पोहोचलो.. आमच्या मालिकेचा शेवट. जेव्हा प्रवास संपतो तेव्हा प्रत्येक कलाकाराचं अंत:करण जड होतं, आठवणी दाटून येतात. कृतज्ञतेने भरलेला असा दिवस. पण या व्यक्तीला (अशोक सराफ) मी यापुढे दररोज भेटू शकणार नाही, ही गोष्ट मनाला फार लागली. ते फक्त सेटवर उपस्थित राहून आम्हाला सर्वांचा दिवस सकारात्मक बनवायचे. सेटवरील माझ्या शेवटच्या दिवशी मी त्यांच्या रुममध्ये आभार मानण्यासाठी गेले होते. ते जितक्या प्रेमाने, आत्मीयतेने वागायचे आणि त्यांचं फक्त निरीक्षण करून मला जे सर्वकाही शिकायला मिळालं, त्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे होते. तेव्हा मी जवळच एक कागदाचा तुकडा पाहिला आणि खऱ्या प्रशंसकाप्रमाणे त्यांचा ऑटोग्राफ मागितला. त्यांनी त्यावर ऑटोग्राफ दिला आणि स्मितहास्य केलं. तिथून निघताना ते असंकाही म्हणाले, जे माझ्यासाठी कौतुकाप्रेक्षाही अधिक आहे’, असा अनुभव तिने सांगितला.
‘त्यांनी विचारलं, ‘थांब.. तुझ्या ऑटोग्राफचं काय? तो क्षण माझ्यासोबत कायम राहील.. ते काय म्हणाले यासाठी नाही, तर ते कोण आहेत यासाठी. माझ्यासाठी अशोक सराफ हे आहेत. फक्त अप्रतिम कलाकार नाही पण त्यासोबतच सुंदर व्यक्ती, जे त्यांच्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक ज्युनिअर, सीनिअरला तितक्याच आदराने आणि प्रेमाने वागवतात. काही लोक फक्त त्यांच्या कामाने नाही तर व्यक्तिमत्त्वानेही तुम्हाला प्रेरणा देतात. या अनुभवासाठी मी कायम ऋणी असेन’, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.