कंबरेखालचे, नॉनव्हेज जोक्सबद्दल अशोक सराफ यांची रोखठोक भूमिका, म्हणाले..

अचूक विनोदाचं टायमिंग आणि जबरदस्त अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेते अशोक सराफ यांनी कलाविश्वात मोठं नाव कमावलं. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आपली विशेष छाप उमटवली आहे. परंतु स्क्रिप्टच्या निवडीबाबत ते खूप सजग असत.

कंबरेखालचे, नॉनव्हेज जोक्सबद्दल अशोक सराफ यांची रोखठोक भूमिका, म्हणाले..
Ashok Saraf
Image Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2025 | 11:42 AM

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. त्यांची ‘हम पांच’ ही मालिका विशेष गाजली होती. ही मालिका सलग पाच वर्षं लोकप्रियतेच्या शिखरावर होती. ही लोकप्रियताही काही अशीतशी नव्हती. ‘हम पांच’ बघता यावी म्हणून लोकांनी आपल्या जेवणाच्या वेळा बदलल्या होत्या. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. ‘हम पांच’च्या यशानंतर अशोक सराफ यांच्याकडे टीव्ही मालिकांच्या ऑफरची रांगच लागली होती. जवळपास शंभरेक मालिका त्यांच्याकडे आल्या असतील. परंतु त्यांनी त्या सगळ्या ऑफर्स नाकारल्या. कारण पुन्हा तसंच काही करणं त्यांना योग्य वाटत नव्हतं.

“तो मोह टाळला..”

‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात अशोक सराफ यांनी यामागचं कारण सविस्तर सांगितलं आहे. “या मालिकांपैकी दोन-चार जरी मी स्वीकारल्या असत्या तर मी स्टार बनून गेलो असतो. मी तो मोह टाळला. सोप ऑपेरा करायचा नाही असाही निर्णय मी घेतला होता. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिथे व्यक्तिरेखेचा विचार करणं वगैरे काही नसतंच. त्या व्यक्तिरेखेची बांधणी करणं तर दूरच”, असं अशोक सराफ म्हणाले.

“..तरीही ती मालिका नाकारली”

काही मालिकांचा विनोद त्यांना पटणारा नव्हता. कंबरेखालच्या विनोदांबद्दल त्यांची भूमिका ठाम होती. याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “एक मालिका माझ्याकडे आली होती. खूप मोठी रक्कम त्यांनी मला देऊ केली होती. मी स्क्रिप्ट बघायला मागितलं. ते वाचताना लक्षात आलं की यात कंबरेखालचे विनोद ठासून भसले आहेत. त्यावेळी खरंतर माझ्याकडे खूप काम होतं अशातला भाग नाही, तरीही मी ती मालिका नाकारली”, असं ते म्हणाले. यामागचं कारणसुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.

“तसा विनोद करून आपण स्वत:चीच किंमत कमी करून घेणार आहोत असं माझं मत होतं. कंबरेखालचे विनोद मला जमतच नाहीत. एखादा नॉनव्हेज जोक असायला माझी हरकत नसते, पण त्यातही ग्रेस हवी. पैसे मिळतात म्हणून काहीही करावं हे मला कधीच मान्य नव्हतं. आपण चांगलं काम करू शकतो हा विश्वास होता, त्यामुळे आता या क्षणी काम नसलं तरी ते मिळणार याची खात्री होती. त्यामुळे मनाविरुद्ध एखादी भूमिका करणं, पैसे मिळवण्यासाठी आपल्या तत्त्वांशी तडतोड करणं मी कधीच केलं नाही, मला ते करावंसं वाटलंही नाही”, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.