
अभिनेते सुनील शेट्टी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. या वक्तव्यांमुळे त्यांना बऱ्याच ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. मुलगी अथिया शेट्टीच्या नॉर्मल डिलिव्हरीनंतर त्यांनी सर्वांना सी-सेक्शनपासून वाचण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नव्हे तर पतीने त्याचं करिअर बनवावं आणि पत्नीने मुलाबाळांची देखभाल करावी, असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या मतांवरून नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील यांनी सांगितलं की, त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मुलगी अथियाचं पूर्ण लक्ष असतं आणि काही चुकीचं म्हटल्यास ती त्यांना फटकारते.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, “मी प्रमोशनल कार्यक्रमांदरम्यान सहसा वादग्रस्त प्रश्नांपासून वाचण्याचा प्रयत्न करतो. मी अशा पद्धतीचा माणूस आहे जो कधी-कधी उत्तर देऊ इच्छितो आणि मग त्यातच गडबड होते. मग घरी अथिया फटकारते, पापा, तुम्ही असं का म्हणालात? फक्त नो कमेंट म्हणा. ती मला सतत या गोष्टीची आठवण करून देते की मी असं काही म्हणू नये, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी माझ्यासमोर समस्या उभी राहील. तिचं माझ्या मुलाखतींवर विशेष लक्ष असतं. खरं सांगायचं झालं तर, मला फक्त तिचीच भीती वाटते. एका व्यक्तीसाठी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या आयुष्यात एक मुलगी असणं.”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “आजकालच्या काळात सर्वजण सी-सेक्शनची निवड करत असताना माझ्या मुलीने नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय निवडला. रुग्णालयातील प्रत्येक नर्स आणि डॉक्टरांनी म्हटलं होतं की, ज्या प्रकारे ती संपूर्ण प्रक्रियेला सामोरी गेली, ते अविश्वसनीय आहे. एक वडील म्हणून माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.” या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यांना ट्रोल केलं होतं. अभिनेत्री गौहर खाननेही त्यांच्या मतावर नाराजी व्यक्त केली होती.
“मी हे स्पष्टपणे सांगू इच्छिते की नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सी-सेक्शन.. यापैकी एकाची निवड करणं हे महिलेच्या हातात नसतं. काही महिला नॉर्मल डिलिव्हरी करू शकतात, तर काहींसाठी ते शक्य नसतं. अनेकदा मेडिकल परिस्थितीमुळे डॉक्टरांना निर्णय घ्यावा लागतो. आई आणि बाळ दोघांची सुरक्षा महत्त्वाची असते. सी-सेक्शन काही शॉर्टकट नाही. ही फक्त एक गरज असून ते संपूर्णपणे नैसर्गिक आहे. जरी महिला सी-सेक्शनचा पर्याय निवडत असतील तरी तो कोणत्याच अर्थाने सोपा पर्याय नाही. हा केवळ लोकांचा गैरसमज आहे”, अशा शब्दांत तिने नाव न घेता सुनील शेट्टी यांना फटकारलं होतं.