Bhimashankar Tree Cutting: भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर अतुल कुलकर्णींचा सरकारला थेट सवाल; पोस्ट चर्चेत
Atul Kulkarni: अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी भीमाशंकर इथल्या वृक्षतोडीप्रकरणात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी सरकारलाच सवाल केला आहे. अमुक इतकी झाडं पाडणं म्हणजे अमुक इतकी रोपं लावणं असं असू शकतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Bhimashankar Tree Cutting: भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आता मराठी मनोरंजनविश्वातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत वृक्षतोड आणि वृक्षलागवडीच्या दाव्यांवर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘अमुक इतकी झाडं पाडणं म्हणजे अमुक इतकी रोपं लावणं, असं असू शकतं?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. झाडांची तोड केल्यानंतर त्याबदल्यात रोपं लावण्याची घोषणा केली जाते; मात्र रोपांचं मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. त्यामुळे भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पोस्टची चर्चा होत आहे.
‘वृक्षलागवड की रोपं लावणं?’
अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये वृक्षलागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांवरच प्रश्न उपस्थित केला आहे. ‘वृक्ष लागवड’, ‘झाडं लावणं’ असं काही असतं की आपण प्रत्यक्षात फक्त रोपं लावतो, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यांच्या मते, रोप लावणं आणि मोठं झाड तयार होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. रोपाचं वृक्षात रूपांतर होण्यासाठी वेळ, योग्य देखभाल, पाणी आणि पोषक वातावरणाची गरज असते. ही प्रक्रिया अत्यंत जिकिरीची असून त्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यामुळे वृक्षतोडीची भरपाई म्हणून केवळ रोपं लावल्याची संख्या सांगणं पुरेसं आहे का, असा मुद्दा त्यांनी मांडला आहे.
अतुल कुलकर्णी यांची पोस्ट-
“वृक्ष लागवड” “झाडं लावणं” असं काही असतं? की आपण ‘रोपं’ लावतो?
रोपांचे वृक्ष होणं ही फार जिकिरीची आणि प्रचंड वेळ घेणारी प्रक्रिया असते.
‘अमुक इतकी झाडं पाडणं = अमुक इतकी रोपं लावणं’ असं असू शकतं?
#GlobalPhenomenon
— atul kulkarni (@atul_kulkarni) October 27, 2026
वृक्षतोडीच्या बदल्यात रोपं लावणं पुरेसं आहे का?
अतुल कुलकर्णी यांच्या पोस्टमधून वृक्षतोडीच्या बदल्यात रोपं लावण्याच्या संकल्पनेवर मूलभूत प्रश्न उपस्थित झाला आहे. एखाद्या ठिकाणी अनेक वर्षांपासून उभी असलेली झाडं तोडली जातात आणि त्याऐवजी मोठ्या संख्येने रोपं लावण्याची घोषणा केली जाते. मात्र, नव्याने लावलेल्या रोपांना मोठ्या वृक्षांचं रूप येण्यासाठी अनेक वर्षं लागतात. या काळात जुन्या झाडांकडून मिळणारी सावली, पक्ष्यांना मिळणारा अधिवास आणि पर्यावरणीय फायदे तात्काळ उपलब्ध होत नाहीत.
भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. या प्रकल्पासाठी 90 हजार झाडं लावण्याचं नियोजन असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात संबंधित प्रकल्पासाठी अवैध वृक्षतोड सुरू नसल्याचं वनविभागाने स्पष्ट केलं आहे.
अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये रोपं लावणं आणि वृक्ष निर्माण करणं यातील फरक समजून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. त्यांच्या प्रश्नामुळे वृक्षतोडीची भरपाई करताना केवळ किती रोपं लावली जाणार, यापेक्षा त्यांचं संगोपन कसं होणार, किती रोपं जगतील आणि त्यांचं वृक्षांमध्ये रूपांतर होईल का, याचाही विचार होणं आवश्यक असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
