
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं असलेले आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर, (Suchitra Bandekar) यांच्या लाडक्या लेकाचं सोहम बांदेकर याटं नुकतचं लग्न झालं. 2 डिसेंबर रोजी सोहम (Soham Bandekar) आणि पूजा बिरारी (Pooja Birari) यांचं थाटामाटात लग्न झालं. पण या लग्नसोहळ्यानंतर बांदेकरांच्या घरात एक दु:खद घटना घडली आहे. त्यांच्या घरातील सदस्य, त्यांचा लाडका श्वान ‘सिंबा’चं निधन झालं आहे. खुद्द सोहम बांदेकर यानेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही बातमी शेअर केली आहे. सोहमने त्यांच्या लाडक्यांना ‘सिंबा’साठी एक मोठी इमोशनल पोस्ट लिहीत त्याला अखेरचा निरोप दिला आहे.
माझा सर्वात मोठा पाठिंबा, माझ्या आयुष्यातील प्रेम.. सोहमची इमोशनल पोस्ट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील अधिकृत अकाऊंटवर सोहमने सिंबाचे काही खास फोटो शेअर केले. त्याच्या जाण्याने खचलेल्या सोहमने सिंबासाठी कॅप्शनद्वारे एक खास पोस्टही लिहीली. ” माझ्या आयुष्यातील 28 वर्षांपैकी जवळपास 17 वर्षं माझा साथीदार, माझा पार्टनर, रूममेट, माझा आधारस्तंभ, माझा समुपदेशक, माझा सर्वात मोठा पाठिंबा आणि माझ्या आयुष्यातील प्रेम आता माझ्यासोबत नाही. त्याने आता माझी साथ सोडून त्याचं प्रेम आणि सहवास देवांसोबत शेअर करण्याचं ठरवलं आहे. मिळालेल्या प्रत्येक नि:स्वार्थ आणि निखळ प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. तू नेहमीच आमच्यासोबत असशील.” असं सोहमने लिहीलं आहे.
” सिंबावर तुम्हा सगळ्यांनी भरभरुन प्रेम केलं. प्रत्यक्ष भेट न झाली तरी तुमचं प्रेम आणि जिव्हाळा त्याला नेहमी जाणवत राहिला. यासाठी आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो -” असंही खाली नमूद करत सोहमने सर्वांचे आभार मानले आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या असून सिंबाच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“Simba कोणत्या तरी रूपात पुन्हा नक्की तुझ्याकडे येईल” असं एकाने कमेंटमध्य़े लिहीलं आहे. तर ” त्याने तुला एकटं नाही सोडलं…त्याला खात्री झाली की कोणीतरी तुझ्या हक्काची व्यक्ती आत्ता तुझ्या आयुष्यात आली आहे…तेव्हाच त्याने तुझी साथ सोडली…u r so lucky की त्याने तुझा खूप विचार केला….तो नेहमीच तुझ्यासोबतच असेल….” असं लिहीतं आणखी एका युजरने सोहमला धीर देण्याचा प्रयत्न केला.
पूजाच्या हातावरही मेहंदीत दिसली सिंबाची झलक
सोहम आणि पूजा बिरारी याचं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्न झालं. त्यापूर्वी पूजाच्या मेहंदी सोहळ्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. पूजाच्या हातावरची मेहंदी तर खूप सुंदर होतीच, पण अनेकांना त्यातील एक गोष्ट खटकली होती. मेहंदी सोहळ्यात पूजा बिरारी हिने आपल्या हातावर एक कुत्र्याचं चित्र काढलं होतं, पण तिने तसं का केलं असा प्रश्न अनेकांच्या मनात होता, काहींनी कमेंट्स करूनही हाच प्रश्न विचारला होता.
लग्नानंतर सोहमचे वडील, अभिनेता आदेश बांदेकर यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिलं होतं. पूजा बिरारी यांनी आपल्या हातावर ज्या कुत्र्याचं चित्र काढलं, तो कुत्रा म्हणजे बांदेकरांचा लाडका सिंबा होता, खुद्द आदेश बांदेकर यांनीच तो खुलासा केला. आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम लहान असताना बांदेकर कुटुंबानं सिंबाला आपल्या घरी आणलं होतं. त्यानंतर या कुटुंबाला या कुत्र्याचा एवढा लळा लागला की तेव्हापासून हा कुत्रा त्यांच्याच घरी होता. पूजानेही त्याचं सिंबाला मेहंदीतून आपल्या हातावर स्थान दिलं होतं. आदेश बांदेकर यांनीच हे कारण सर्वांना सांगितलं होतं. आता त्याच सिंबाचं निधन झालं असून त्याच्या जाण्याने बांदेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.