
ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर रिलीज झालेली हॉरर वेब सीरिज भय: द गौरव तिवारी मिस्ट्री सध्या प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. ही सीरिज भारतातील प्रसिद्ध पॅरानॉर्मल तज्ज्ञ गौरव तिवारी यांच्या खऱ्या आयुष्यावर आणि त्यांच्या रहस्यमयी मृत्यूवर आधारित आहे. खऱ्या घटनेवर आधारित ही कथा फक्त भय निर्माण करत नाही, तर प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडते.
रिलीज झाल्यापासून ‘भय’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हॉरर पाहायला आवडणारे चाहते ती बिंज-वॉच करत आहेत. अलीकडेच रिलीज झालेल्या या सीरिजने लोकांना खरंच भयभीत केले आहे. तसेच क्रिटिक्सकडूनही या सीरिजला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत.
मृतदेहगृहापासून सुरू होणारी कथा, जी अंगावर काटा आणते
सीरिजची सुरुवात एका थरारक शवगृहाच्या दृश्याने होते. तिथे गौरव तिवारी यांचे पोस्टमॉर्टेम सुरू असते. सुरुवातीला पोलिस ही आत्महत्या समजतात, पण त्या्ंच्या गळ्यावरील विचित्र खुणा कथेला वेगळे वळण देते. तेव्हा एका लेखिकेची एन्ट्री होते, जी गौरव यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यास सुरुवात करते आणि कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. येथे प्रेक्षक पाहतात की, पायलट होण्याचे स्वप्न पाहणारा तरुण कसा पॅरानॉर्मल जगाच्या गहनतेत उतरतो.
रहस्यमयी मृत्यू आणि अनुत्तरित प्रश्न
फ्लॅशबॅकमध्ये दाखवले जाते की, गौरव पायलट होण्याचे स्वप्न पाहत होते. पण एक दिवशी विमान उडवताना त्यांच्यासोबत काहीतरी असामान्य घडते आणि ते पॅरानॉर्मल तज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतात. या काळात ते इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीत सामील होतात, जिथे त्यांच्यासोबत तीन इतर लोक काम करतात. सुरुवातीला सर्व काही ठीक असते, पण पाच वर्षांनंतर त्यांच्यासोबत विचित्र घटना घडू लागतात आणि शेवटी रहस्यमयी पद्धतीने गौरव यांचा मृत्यू होतो. ‘भय’ सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवते. सीरिजमध्ये असे अनेक सीन आहेत जे पाहून तुमच्या अंगावर काटे येतील.
उत्तम अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शन
सीरिजमध्ये करण टॅकर यांनी गौरव तिवारी यांच्या भूमिका जीवंत केली आहे आणि त्यांचा गंभीर अंदाज कथेला मजबूत बनवतो. त्यांच्यासोबत कल्कि कोचलिन, सलोनी बत्रा, दानिश सूद, शुभम चौधरी आणि निमिशा नायर महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी रॉबी ग्रेवाल यांनी सांभाळली आहे, ज्यांनी भय आणि सस्पेंसला वेगळ्या पद्धतीने सादर केले आहे. १२ डिसेंबर रोजी रिलीज झालेली ही सीरिज हॉरर प्रेमींसाठी ओटीटीवर एक उत्तम ट्रीट आहे.