Star Pravah Serial : स्टार प्रवाहच्या मालिकेत अनोखा ट्विस्ट, लोकप्रिय जोडीचा बदलला लूक; तुम्ही ओळखलं का?
Star Pravah Serial : स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत नवा ट्विस्ट आला असून तुम्ही या जोडीला ओळखलंत का?

स्टार प्रवाहची ठरलं तर मग मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्गही मोठा आहे. ‘ठरलं तर मग‘ या मालिकेमध्ये दिवसेंदिवस नव–नवीन ट्विस्ट येत असतात. अशातच आता मुलींच्या अपहरणाच्या खोट्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर सायली आणि अर्जुनने मिळून या प्रकरणाचा छडा लावायचा ठरवलंय. त्यासाठीच महिपत आश्रमात वेषांतर करुन ते शोध घेण्यासाठी पोहोचणार आहेत. मालिकेतला जुई गडकरी आणि अमित भानुशालीचा हा लूक लक्षवेधी ठरणार आहे.
अर्जुन-सायलीचा नवा लूक
अर्जुनची भूमिका साकारणारा अमित भानुशाली या नव्या लूकसाठी तब्बल दोन तास मेकअपच्या प्रक्रियेतून जातोय. अमितच्या या लूकसाठी प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शूटिंगसोबतच मेकअप करण्यासाठी आणि शूटिंगनंतर तो काढण्यासाठीही अमितला बराच वेळ द्यावा लागतोय. मात्र, व्यक्तिरेखेच्या या नव्या रूपासाठी अमितची मेहनतही तितकीच खास आहे. या लूकमध्ये रेडी झाल्यावर अमितने पहिल्यांदा जेव्हा आरशात स्वत:ला पाहिलं तेव्हा तो ओळखूच शकला नाही. अमितच काय सेटवरील इतर मंडळीही अमितला ओळखू शकले नाहीत. गंमत म्हणजे अमितचा फोन अनलॉक करण्यासाठी फेस आयडीचा वापर केला असता, तोही सुरु होत नव्हता इतका त्याचा चेहरा वेगळा दिसत होता.
दुसरीकडे, सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीचा अनुभव मात्र याच्या अगदी उलट आहे. जुई मंजुळा जाधव या रूपात दिसणार असून या लूकसाठी तिने स्वतःच मेकअप केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दहा मिनिटांत जुईने हा मेकअप पूर्ण केला. या रॉ आणि साध्या लूकमुळे जुईलाही तो खूप आवडला आहे. या लूकसाठी फारसा मेकअप किंवा टचअपची गरज नसल्याने शूटिंगदरम्यान तिचा वेळही वाचतोय. सायली आणि अर्जुन महिपत आश्रमात पोहोचून या प्रकरणामागचं सत्य शोधू शकतील का? त्यांचं वेषांतर कोणाच्या लक्षात येणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, ‘ठरलं तर मग‘ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री 8:30 ला प्रसारित होते.
