
Sushant Singh Rajput Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील सुशांतच्या चर्चा फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, सेलिब्रिटींमध्ये देखील रंगलेल्या असतात. काही दिवसांपूर्वी सीबीआयने वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या खटल्याचा अखेर निकाल दिला. सीबीआयने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणताही कट नव्हता किंवा कोणताही गुन्हेगारी कट सापडला नाही. त्याची हत्या नाही तर, आत्महत्या आहे… असं देखील क्लोजर रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. यासोबतच अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीलाही सीबीआयने क्लीन चिट देऊन निर्दोष मुक्त केले आहे. यावर अभिनेता राजीव अदातिया याने मोठं वक्तव्य केलं आहे.
राजीव अदातिया याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 15’ मध्ये स्पर्धक म्हणून राजीव याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता सुशांतच्या क्लोजर रिपोर्टवर राजीव अदातिया याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या राजीव अदातिया याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राजीव अदातिया म्हणाला, ‘सुशांत खरंच खूप चांगला मुलगा होता. मी त्याला दर वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचो. आता सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआयने तपास बंद केला आहे. खरं तर मला रिया चक्रवर्तीसाठी वाईट वाटत आहे. कारण तिने अनेक संकटांचा सामना केला आहे.’
‘सरकारवर विश्वास आहे, पोलिसांवर विश्वास आहे कारण त्यांनी सांगितलं आहे. पण जे काही सत्य आहे ते फक्त सुशांत यालाच माहिती आहे. मला त्याच्या कुटुंबाचं, वडिलांचं आणि बहिणींसाठी वाईट वाटत आहे. कारण त्यांनी त्यांचा मुलगा आणि भाऊ गमावला आहे…’ असं देखील राजीव म्हणाला आहे.
14 जून, 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे याठिकाणी असलेल्या राहत्या घरात स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये सर्वत्र खळबळ माजली होती आणि अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले. ज्यामुळे 6 ऑगस्ट 2020 मध्ये सीबीआयने तपास करण्यास सुरुवात केली. अखेर मार्च 2025 मध्ये सीबीआय मृत्यू प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केलं आहे.