‘बिग बॉस 17’च्या ग्रँड फिनालेची तारीख बदलली; ‘या’ दिवशी जाहीर होणार विजेता

'बिग बॉस 17' या शोमध्ये सध्या बारा स्पर्धक राहिले आहेत. या स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे. आता बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या तारखेविषयी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहेय. टीआरपीच्या यादीत हा शो टॉप 10 मध्येही नसल्याने ग्रँड फिनालेविषयी निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे.

बिग बॉस 17च्या ग्रँड फिनालेची तारीख बदलली; या दिवशी जाहीर होणार विजेता
| Updated on: Dec 30, 2023 | 10:30 AM

मुंबई : 30 डिसेंबर 2023 | छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. बिग बॉसचा सतरावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या सिझनमध्ये काही स्पर्धक पतीसह शोमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र तरीसुद्धा टीआरपीच्या यादीत हा शो विशेष कमाल करू शकला नाही. दोन आठवड्यांनंतर ‘बिग बॉस 17’च्या टीआरपीमध्ये वाढ झाली, मात्र टॉप 10 यादीत आपलं स्थान मिळवण्यात हा शो अपयशी ठरला आहे. म्हणूनच गेल्या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच हा शो अधिक वाढवला जात नाहीये. बिग बॉसची अंतिम तारीख जी निश्चित करण्यात आली होती, त्याच तारखेला ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

कधी होणार ‘बिग बॉस 17’चा फिनाले?

टेलीचक्कर या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, आधी ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले हा 15 आठवड्यांनंतर 28 जानेवारी 2024 रोजी होणार होता. मात्र आता ‘बिग बॉस 17’चा विजेता एक दिवसानंतर म्हणजेच 29 जानेवारी 2014 रोजी घोषित केला जाणार आहे. ‘बिग बॉस 17’ संपल्यानंतर कलर्स टीव्हीवर डान्स शो ‘डान्स दिवाने’ सुरू होणार आहे. या शोचा ग्रँड प्रीमिअर 3 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडणार आहे.

या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलंय की सलमान खान हा जानेवारीचा दुसरा ‘वीकेंड का वार’ म्हणजेच 10 आणि 11 जानेवारी रोजी प्रसारित होणाऱ्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडचं शूटिंग करणार नाही. इतर कामांमुळे सलमान ही शूटिंग करू शकणार नाही. सलमानचा कलर्स टीव्ही आणि बिग बॉसच्या निर्मात्यांसोबत तसा करारच आहे. ज्यादिवशी सलमानला इतर प्रोजेक्ट्सची कामं असतील, तेव्हा तो बिग बॉसचं सूत्रसंचालन करू शकणार नाही. सलमानच्या सूत्रसंचालनाची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनीही ही अट मान्य केली. त्यामुळे त्याच्या जागी कधी करण जोहर तर कधी अरबाज खान आणि सोहैल खान हे ‘वीकेंड का वार’ एपिसोडचं सूत्रसंचालन करताना दिसतात.

सध्याच्या घडीला ‘बिग बॉस 17’च्या घरात एकूण 12 सदस्य आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, नील भट्ट, अरुण महाशेट्टी, आऊरा, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अनुराग डोभाल, रिंकू धवन, ईशा मालवीय, अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल यांचा समावेश आहे. यापैकी बिग बॉसच्या विजेतेपदावर कोण मोहोर उमटवणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.