
टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 24 ऑगस्ट रोजी या शोचा प्रीमिअर पार पडणार आहे. यंदाच्या एकोणिसाव्या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. ‘बिग बॉस 19’मध्ये 15 स्पर्धक घरात राहणार आहेत. त्यापैकी काहींची नावं समोर आली आहेत.
सर्वांत आधी ज्या अभिनेत्याचं नाव निश्चित झालंय, तो आहे गौरव खन्ना. टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय ‘अनुपमा’ या मालिकेत त्याने भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’मध्येही भाग घेतला होता. गौरवचा मोठा चाहतावर्ग असून तो इतर स्पर्धकांना तगडी टक्कर देऊ शकतो. इतकंच नव्हे तर गौरव हा या सिझनमधील सर्वांत महागडा स्पर्धक असल्याचंही कळतंय.
एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत लोकप्रिय स्टार बनलेली अशनूर कौरसुद्धा या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचं कळतंय. हा तिच्या करिअरमधील पहिलाच रिॲलिटी शो असेल. ‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार, अशनूरच्या कुटुंबीयांनी तिला बिग बॉसच्या घरात सांभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मुलीची योग्य काळजी घेतली जावी, यासाठी निर्मात्यांकडून आश्वासन घेतलं आहे. अशनूरला नकारात्मक पद्धतीने दाखवलं जाऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.
याशिवाय कंटेट क्रिएटर आणि खऱ्या आयुष्यातील जोडी आवेज दरबार आणि नगमा मिराजकरसुद्धा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. अशातच त्यांना बिग बॉसच्या घरात एकाच छताखाली राहताना पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. टीव्ही अभिनेता बशीर अली, अभिषेक बजाज, हुनर हाले आणि शफर नाजसुद्धा ‘बिग बॉस 19’मध्ये भाग घेणार आहेत. अभिषेक, हुनर आणि शफक पहिल्यांदाच रिॲलिटी शोमध्ये सहभागी होत आहेत. शफकची बहीण फलक नाज ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये दिसली होती. तर बशीर अलीला याआधी ‘रोडीज’, ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘ऐस ऑफ स्पेस’सारख्या शोजमध्ये पाहिलं गेलंय. ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्सविला’मध्ये सहभागी झालेल्या सिवेट तोमर आणि खनक वाघनानी यांनीसुद्धा ‘बिग बॉस 19’चा करार साइन केल्याचं कळतंय.
गेमिंग व्हिडीओ क्रिएटर पायल धरे, लेखक आणि अभिनेता जीशान कादरी, युट्यूबर मृदुल तिवारी, शहनाज गिलचा भाऊ शाहबाज बदेशा यांनाही बिग बॉसच्या घरात पाहता येणार आहे. याच्या व्यतिरिक्त ‘इंडियन आयडॉल 5’ आणि ‘बिग बॉस तेलुगू 5’चा रनरअप श्रीराम चंद्र, ‘बिग बॉस मराठी’ फेम अरबाज पटेल, ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री निधी शाह आणि कंटेंट क्रिएटर किरक खाला ऊर्फ प्रिया रेड्डी, रॅपर जोडी सीधे मौत, सामाजिक कार्यकर्ते अथुल किशन आणि वकील अली काशिफ खान यांनासुद्धा शोची ऑफर मिळाली आहे. ‘बिग बॉस 19’चा ग्रँड प्रीमिअर येत्या 24 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. हा शो कलर्स टीव्हीवर दररोज रात्री 10.30 वाजता आणि जियो हॉटस्टारवर रात्री 9 वाजता प्रसारित होईल.