Bigg Boss 19 : बिग बॉसच्या इतिहासातील सर्वांत महागडी स्पर्धक; 3 दिवसांसाठी घेतले 2.5 कोटी रुपये

बिग बॉस या शोचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु बिग बॉसच्या इतिहासातील सर्वांत महागडा स्पर्धक कोण, हे तुम्हाला माहीत आहे का? या स्पर्धकाने अवघ्या तीन दिवसांसाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतलं होतं.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या इतिहासातील सर्वांत महागडी स्पर्धक; 3 दिवसांसाठी घेतले 2.5 कोटी रुपये
Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 22, 2025 | 12:13 PM

सलमान खानचा सर्वांत लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ एका नव्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बिग बॉस’चा हा एकोणिसावा सिझन आहे. त्यात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही स्पर्धकांची नावंही चर्चेत आली आहेत. तर कोणाला किती मानधन मिळालंय, हे जाणून घेण्यासाठीही चाहते आतूर असतात. बिग बॉसच्या स्पर्धकांच्या मानधनाचा उल्लेख अनेकदा चाहत्यांमध्ये होत असतो. टेलिव्हिजनवरील हा सर्वांत लोकप्रिय शो असल्याने दर आठवड्याला स्पर्धकांना चांगली रक्कम मिळते. त्या त्या स्पर्धकाच्या लोकप्रियतेनुसार ही फी ठरवली जाते. ‘बिग बॉस’च्या इतिहासात अशाच एका स्पर्धकाने भरभक्कम मानधन स्वीकारलं होतं.

सर्वाधिक मानधन घेणारी ही स्पर्धक ‘बिग बॉस’च्या चौथ्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. हा सिझन अनेक कारणांमुळे खास ठरला होता. यामध्ये एका हॉलिवूड अभिनेत्रीने एण्ट्री केली होती. विशेष म्हणजे ती बिग बॉसच्या घरात फक्त तीनच दिवस राहिली होती आणि त्यासाठी तिने निर्मात्यांकडून तब्बल 2.5 कोटी रुपये घेतले होते. मानधनाची ही रक्कम बिग बॉसच्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेपेक्षाही अधिक आहे. बिग बॉसच्या विजेत्याला 50 लाख रुपये मिळतात. काही सिझन्समध्ये ही रक्कम एक कोटी रुपये इतकीसुद्धा होती.

बिग बॉसच्या चौथ्या सिझनचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा या स्पर्धकाचं नाव आवर्जून घेतलं जातं. या सिझनमध्ये हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसनने भाग घेतला होता. ती बिग बॉसच्या घरात फक्त तीनच दिवस राहिली होती. पामेलाच्या एण्ट्रीमुळेच हा सिझन चर्चेत आला होता. या सिझनचं विजेतेपद अभिनेत्री श्वेता तिवारीने पटकावलं होतं. याशिवाय शोमध्ये अश्मित पटेल, डॉली बिंद्रा, ग्रेट खली यांसारखे स्पर्धकसुद्धा सहभागी झाले होते. परंतु पामेलाच्या एण्ट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तिचीच चर्चा होऊ लागली होती.

पामेला ही कॅनेडिनय-अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ‘बेवॉच’ या ड्रामा सीरिजमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. पामेला तिच्या बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत होती. त्यावेळी बिग बॉसमध्ये तिने येणं ही खूप मोठी गोष्ट मानली जात होती.