
‘बिग बॉस 19’मध्ये ‘वीकेंड का वार’ एपिसोडच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यादरम्यान प्रेक्षकांना धक्का देणारी एक बातमी समोर आली. कॉमेडियन प्रणित मोरेला या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं. परंतु तो या खेळातून बाद झालेला नाही. प्रणितची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्याला लवकरच सिक्रेट रुममध्ये पाठवलं जाईल. अशातच प्रणितचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या आठवड्यात अभिषेक आणि अशनूरमुळे घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलंय. मालती चहर आणि नीलम गिरी यांना सर्वांत कमी मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढल्याची चर्चा होती. तर डेंग्युची लागण झाल्यानंतर प्रणित मोरेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्रणित बरा झाल्यानंतर त्याला बिग बॉसच्या सिक्रेट रुममध्ये ठेवलं जाईल. जेव्हा तो ठणठणीत होईल, तेव्हा त्याला बिग बॉसच्या घरात परत आणलं जाईल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये प्रणित बेडवर आराम करताना दिसून येत आहे. जेव्हा बिग बॉस त्याला चेकअपसाठी मेडिकल रुममध्ये बोलावतात, तेव्हा त्याचा डेंग्युचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं जातं. प्रणित बरा झाल्यानंतर पुन्हा घरात येणार असल्याची माहिती बिग बॉसने दिली.
याआधी अभिषेक मल्हानसोबत असंच काहीसं घडलं होतं. फिनालेदरम्यान त्याला डेंग्युची लागण झाली होती आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. बरेच दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. जेव्हा तो बरा झाला, तेव्हा थेट त्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. परंतु नंतर त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने तान्या मित्तल, नीलम गिरी आणि कुनिका सदानंद यांना बरंच काही सुनावलं. अशनूरचं बॉडी शेमिंग केल्याने सलमान त्यांच्यावर संतापला होता. त्याचसोबत अभिषेक-अशनूर यांची साथ दिल्यामुळे मृदुललाही सलमानने फटकारलं. या एपिसोडमध्ये सलमानने अमाल मलिकला तान्यासोबतच्या नात्याबद्दल थेट प्रश्न विचारला. तेव्हा ती माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे, असं अमालने स्पष्ट केलं.