
‘बिग बॉस 19’मधील ‘वीकेंड का वार’ ड्रामाने भरलेला असतो. सूत्रसंचालक सलमान खान या एपिसोडमध्ये कोणाची शाळा घेणार, कोणाला फटकारणार याकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष असतं. शनिवारच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमानने काही स्पर्धकांना चांगलंच सुनावलं. यामध्ये नीलम गिरी, तान्या मल्होत्रा आणि कुनिका सदानंद यांचा समावेश होता. मुद्दा होता अशनूर कौरच्या बॉडीशेमिंगचा. यावरून सलमानने तिघींना सुनावल्यानंतर घरातील माहौल पूर्णपणे बदलला होता. त्यानंतर सलमानने त्याचा मोर्चा अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बादेशाकडे वळविला. गेल्या आठवड्यात जेव्हा नॉमिनेशनमध्ये शहबाजचं नाव समोर आलं होतं, तेव्हा त्याने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या नावाचा वापर केला होता. सिद्धार्थच्या चाहत्यांकडून मला पाठिंबा मिळेल, असा अतिआत्मविश्वास त्याने व्यक्त केला होता. यावरूनच सलमानने आता त्याला फटकारलं आहे.
“तू सतत सिद्धार्थ शुक्लाचं नाव का घेतोय”, असा सवाल सलमानने करताच शहबाज त्याची माफी मागतो. “मी सिद्धार्थच्या चाहत्यांची भेट घेत असतो. त्यांच्याशी मी संवाद साधत असतो”, असं शहबाज सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु सलमान त्याची एक गोष्ट ऐकत नाही. “ते सिद्धार्थचे चाहते आहेत. तू काय करतोयस? तू तुझ्या जोरावर खेळ. सिद्धार्थने या शोमध्ये जे काही केलं होतं, ते स्वत:च्या जोरावर केलं होतं. त्याने कधीच कोणाचं नाव घेतलं नव्हतं”, अशा शब्दांत सलमानने राग व्यक्त केला. इतकंच नव्हे तर शहबाजची खेळी सिद्धार्थ शुक्लाच्या खेळीच्या 1 टक्केही बरोबरीचं नाही, असं रोखठोक मत सलमानने मांडलं.
“तर तुला असं वाटतं की सिद्धार्थ शुक्लाचे जे चाहते आहेत, ते ज्याची खेळी 1 टक्काही बरोबरीचं नाही, त्याला पाठिंबा देतील? तुला असं वाटतं की जर सिद्धार्थ शुक्ला इथे असता, तर त्यानेही तुला पाठिंबा दिला असता”, असा उपरोधिक आणि तितकाच संतप्त सवाल सलमान शहबाजला करतो. शहबाज हा अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ आणि गायक आहे. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला हे ‘बिग बॉस’च्या 13 व्या सिझनमध्ये स्पर्धक होते. या सिझनमध्ये दोघांची लव्ह-स्टोरी तुफान चर्चेत होती. सिद्धार्थ आणि शहनाजच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. परंतु सिद्धार्थच्या अचानक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती.