Bigg Boss 20: ‘बिग बॉस’मध्ये होणार घमासान, स्पर्धकच तसे निवडले..; पहा संपूर्ण यादी

Bigg Boss 20: सलमान खानच्या शोमध्ये कोणते चेहरे प्रत्यक्षात घरात प्रवेश करतात आणि कोण घरातील पहिल्याच दिवसापासून ड्रामा सुरू करतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये होणार घमासान, स्पर्धकच तसे निवडले..; पहा संपूर्ण यादी
सलमान खान, बिग बॉस 20
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 02, 2026 | 1:01 PM

छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा 20वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या लोकप्रिय आणि तितक्याच वादग्रस्त शोचा ग्रँड प्रीमियर येत्या 6 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून, यंदाही सलमान खान सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. प्रीमियर जवळ येत असताना संभाव्य स्पर्धकांच्या नावांबाबत सोशल मीडिया आणि मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या सिझनसाठी तब्बल 22 नावं चर्चेत आहेत. त्यापैकी सुमारे 15 जणांची नावं जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे, तर अन्य सात नावांबाबत अजूनही अंदाज आणि चर्चा सुरू आहे. त्यामुळे ग्रँड प्रीमियरपर्यंत या यादीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चर्चेत असलेल्या नावांमध्ये टीव्ही कलाकार, सोशल मीडिया स्टार, डिजिटल क्रिएटर्स, गायक आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असल्याचं विविध रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. मृदुल तिवारी आणि शहबाज बदेशा यांची नावं विशेष चर्चेत आहेत. याशिवाय करण वाही, अरिश्फा खान, अम्रपाली दुबे, माही विज आणि मेरी कोम यांसारखी नावंही संभाव्य स्पर्धक म्हणून चर्चेत आली आहेत. मात्र या सर्व नावांवर निर्मात्यांकडून अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही.

या यादीतील सर्वात आश्चर्यकारक नाव म्हणजे ऑलिम्पिक बॉक्सर मेरी कोम. त्या ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही काळापासून सुरू आहे. जर हे वृत्त खरं ठरलं, तर क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीला रिअॅलिटी शोमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना पहिल्यांदाच मोठी संधी मिळू शकते. तसंच करण वाहीचं नावही चर्चेत आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आणि होस्ट म्हणून त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडिया स्टार अरिश्फा खान आणि भोजपुरी अभिनेत्री अम्रपाली दुबे यांची नावंही संभाव्य स्पर्धकांच्या यादीत आहेत. निती टेलर, पार्थ समथान, प्रणाली राठोड, माही विज, गीता बसरा, सुनील पाल आणि दीपिका सिंह यांच्याही नावांची चर्चा आहे.

यंदाच्या शोमध्ये नवा ट्विस्ट

‘बिग बॉस 20’ केवळ स्पर्धकांच्या यादीमुळेच नाही, तर नव्या ट्विस्टमुळेही चर्चेत आहे. यंदा निर्मात्यांनी ‘एक्स्ट्रा जीवनदान’ असा ट्विस्ट आणला आहे. यामुळे एलिमिनेशनची प्रक्रिया अधिक मनोरंजक होण्याची शक्यता आहे. याशिवाय दोन संभाव्य स्पर्धकांपैकी एका व्यक्तीची निवड प्रेक्षकांच्या मतदानातून होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. रिया अहीर आणि लव्ह गिल यांच्यापैकी कोणाला घरात प्रवेश मिळणार, हे प्रेक्षकांच्या मतांवर अवलंबून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us