Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेपूर्वी ‘हा’ लोकप्रिय स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घराबाहेर; चाहत्यांना बसला धक्का!

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला असून घरातून आणखी एका सदस्याचा पत्ता कट झाला आहे. या सदस्याने घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.

Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेपूर्वी हा लोकप्रिय स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घराबाहेर; चाहत्यांना बसला धक्का!
Bigg Boss Marathi 6
| Updated on: Apr 12, 2026 | 8:55 AM

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनमध्ये विजेतेपद जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. हा सिझन सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून नुकत्याच एका सदस्याला घराबाहेर पडावं लागलं आहे. या आठवड्यात राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि राखी सावंत हे पाच सदस्य नॉमिनेट झाले होते. या पाचपैकी एका सदस्याला सर्वांत कमी मतं मिळाली आणि तिचा बिग बॉसमधून पत्ता कट झाला. ही सदस्य दुसरी-तिसरी कोणी नसून राखी सावंत आहे. राखीने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री करत सर्वांची मनं जिंकली होती. तिच्या बेधडक, बिनधास्त आणि विनोदी अंदाजामुळे बिग बॉसचे एपिसोड्स आणखी मनोरंजक झाले होते. मात्र ग्रँड फिनालेआधीच तिला घराबाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राखीला सर्वांत कमी मतं मिळाली होती. तरीसुद्धा राखीचा बिग बॉस मराठीच्या घरातील आतापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय ठरला होता. घरात एण्ट्री केल्यापासून तिचा हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू झाला होता. ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्येही रितेशसोबत राखीची मजामस्करी सुरू असायची. घरातील इतर सदस्यांसोबत, विशेषकरून राकेश बापटसोबत तिची खास मैत्री पहायला मिळाली. बिग बॉसच्या घराबाहेर पडण्याआधी राखीला तीनपैकी एक दरवाजा निवडायला सांगण्यात आलं होतं. या तिन्ही दरवाजांमागे बक्षिसाची विशेष रक्कम होती. दहा हजार, दहा लाख आणि सात लाख रुपये अशी ही बक्षिसाची रक्कम होती. त्यापैकी राखीने लाल रंगाचा दरवाजा निवडला आणि त्यातून तिने सात लाख रुपये जिंकले. त्यामुळे बिग बॉसच्या विजेत्याच्या बक्षिसाची रक्कम वाढली आहे.

बिग बॉस मराठीच्या विजेत्याला आता 15 लाख रुपये बक्षिस मिळणार आहे. राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि रेवा कौरासे यांच्यात ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे. यापैकी कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राकेश बापट आणि तन्वी यांच्यात ‘तिकिट टू फिनाले’ जिंकण्यासाठी चढाओढ सुरू होती. त्यात तन्वीने बाजी मारली आणि तिला थेट ग्रँड फिनालेमध्ये एण्ट्री मिळाली.

Follow Us