Anuradha Paudwal: मुलाच्या निधनानंतर एकट्या पडल्या, इंडस्ट्री सोडली… सध्या काय करतात अनुराधा पौडवाल?

Anuradha Paudwal: ज्येष्ठ हिंदी चित्रपट गायिका अनुराधा पौडवाल यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेऊया...

Anuradha Paudwal: मुलाच्या निधनानंतर एकट्या पडल्या, इंडस्ट्री सोडली... सध्या काय करतात अनुराधा पौडवाल?
Anuradha Paudwal
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 8:44 AM

अनुराधा पौडवाल भारतीय संगीत जगतातील सर्वात उत्कृष्ट गायिकांपैकी एक आहेत. अनुराधा पौडवाल यांचा आवाज प्रेक्षकांना चित्रपटातील गाण्यांमध्ये जितका आवडला तितकाच त्यांचा आवाज भक्तीगीत आणि भजनांमध्ये देखील श्रोत्यांना आवडला. आपल्या कारकिर्दीत खूप प्रसिद्धी आणि यश मिळवणार्‍या अनुराधा पौडवाल यांचा विवाह अगदी लहान वयातच झाला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण पाहिले, तसेच अनेक दुःखद क्षणही अनुभवले.

अनुराधा पौडवाल यांनी लहान वयातच आपल्या पतीला गमावले होते. तर काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून कारकीर्दीला सुरूवात करणार्‍या अनुराधाने ९० च्या दशकात बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. चला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी…

Loading...

अनुराधा पौडवाल यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील कारवार येथे एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांचे खरे नाव अलका नाडकर्णी होते. मात्र लग्नानंतर त्यांनी आपले नाव बदलले. अनुराधा यांनी संगीत शिकण्यासाठी कधीही औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते. त्यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांसारख्या दिग्गज गायिकांच्या गाण्यांमधून गाण्याचे शिक्षण स्वत:च घेतले होते.

अनुराधा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना पहिले एक मुलगी झाली होती. पण तिच्या जन्मानंतर अवघ्या २५ दिवसांनी निधन झाले. त्यानंतर गायिकेने एक मुलगा आदित्य पौडवाल आणि मुलगी कविता पौडवाल यांना जन्म दिला. कविता गायिका आहेत. तर आदित्य गायक आणि संगीतकार होते. २०२० मध्ये आदित्याने किडनीच्या आजाराने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

१९७३ मध्ये बॉलिवूड डेब्यू करणार्‍या अनुराधांना पहिली मोठी आणि खास ओळख जॅकी श्रॉफ यांच्या १९८३ च्या ‘हीरो’ चित्रपटातील ‘तू मेरा जानू है’ या गाण्याने मिळाली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत ‘बहुत प्यार करते हैं’, ‘तू मेरी जिंदगी है’, ‘तुम्हें अपना बनाने की कसम खाई’, ‘नजर के सामने जिगर के पास’, ‘दिल है कि मानता नहीं’ यासह अनेक उत्कृष्ट गाण्यांमध्ये आपल्या मधूर आवाजाने छाप सोडली.

भजनांनीही जिंकले चाहत्यांचे मन

९० च्या दशकात टी-सिरीजचे मालक आणि गायक गुलशन कुमार यांच्यासोबत त्यांनी एकाहून एक भक्तिगीते गायली. त्या ‘ओम जय अंबे गौरी’ (आरती), ‘श्रद्धा की ज्योति’, ‘जय मां अंबे जय जगदंबे’, ‘दुर्गा अमृतवाणी’, ‘महालक्ष्मी अष्टकम’, ‘मैं तो शिव की पुजारिन बनूंगी’, ‘आरती कुंज बिहारी की’, ‘हे राम’, ‘मिलता है सच्चा सुख केवल शिव तुम्हारे चरणों में’ इत्यादी गाण्यांमुळे घरोघरी लोकप्रिय झाल्या.

बॉलिवूडपासून का दूर राहिल्या?

करिअर यशाच्या शिखरावर असताना अनुराधा यांनी ९० च्या दशकात गुलशन कुमार यांच्यासोबत फक्त भक्तिगीते गाण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत गायिकेने बॉलिवूड सोडण्याच्या कारणाबद्दल बोलताना सांगितले होते की, चित्रपटांच्या बदलत्या स्वरूपामुळेही त्यांनी चित्रपट उद्योगापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अनुराधा यांनी आता व्यावसायिक गायनाचे काम बरेचसे कमी केले आहे. अनुराधांनी १९९०, १९९१ आणि १९९२ मध्ये सलग तीन वेळा बेस्ट सिंगरचा फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावावर केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us