“The Kashmir Files साठी लता मंगेशकर गाणं गाणार होत्या, पण..”; अखेर विवेक अग्निहोत्रींनी चर्चांना दिला पूर्णविराम

1990 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांचं दु:ख या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या चित्रपटासाठी गाणं गाणार होत्या, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यावर आता विवेक अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया दिली आहे.

The Kashmir Files साठी लता मंगेशकर गाणं गाणार होत्या, पण..; अखेर विवेक अग्निहोत्रींनी चर्चांना दिला पूर्णविराम
Vivek Agnihotri and Lata Mangeshkar
Image Credit source: Facebook
| Updated on: Mar 23, 2022 | 11:13 AM

सिनेमागृह ते सोशल मीडियापर्यंत विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार, बॉक्स ऑफिसवरील कमाई अशा सर्व विषयांवरून सोशल मीडियावर मतमतांतरे मांडली जात आहेत. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, पुनीत इस्सार यांसारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिका यामध्ये आहेत. 1990 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांचं दु:ख या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या चित्रपटासाठी गाणं गाणार होत्या, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यावर आता विवेक अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “द काश्मीर फाईल्समध्ये गाणी नाहीत. चित्रपटात एक अत्यंत दु:खद घटना दाखवण्यात आली आहे पण त्याचसोबत हा चित्रपट म्हणजे नरसंहाराला बळी पडलेल्या पीडितांना श्रद्धांजली आहे. मी एका काश्मिरी गायकाने गायलेलं लोकगीत रेकॉर्ड केलं होतं आणि ते गाणं लतादीदींनी गावं अशी आमची इच्छा होती. लतादीदींनी चित्रपटांसाठी गाणं बंद केलं होतं आणि निवृत्ती घेतली होती. पण आम्ही त्यांना विनंती केली. पल्लवीशी त्यांची जवळीक होती आणि त्यामुळेच त्यांनी आमच्या चित्रपटासाठी गाण्यास मान्य केलं.”

“काश्मीरवर लतादीदींना खूप जिव्हाळा होता. कोविडची लाट कमी झाल्यानंतर गाणं रेकॉर्ड करू, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांना स्टुडिओमध्ये जाण्याची परवानगीदेखील नव्हती, म्हणून आम्ही फक्त त्यांच्यासोबत रेकॉर्ड करण्याची वाट पाहत होतो. मात्र गाणं रेकॉर्ड करण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यासोबत काम करणं हे एक स्वप्नच राहिलं,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 6 फेब्रुवारी रोजी लतादीदींचं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या.

द काश्मीर फाईल्सची कमाई-

इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. द काश्मीर फाईल्सला भाजप नेत्यांकडून मिळालेलं समर्थन खूप परिणामकारक ठरलंय. गोवा, मध्य प्रदेश, आसाम, कर्नाटक याठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The Kashmir Filesची कमाई काश्मिरी पंडितांना देण्याचा सल्ला देणाऱ्या IAS अधिकाऱ्याला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर..

थिएटरमध्ये ‘बच्चन पांडे’चा शो सुरू असताना घातला राडा; The Kashmir Filesचा शो लावण्याची मागणी