आलियाला मुलगी होताच रणबीरचा ‘तो’ खास व्हिडीओ होतोय व्हायरल

आलियाची मुलगी कशी दिसणार? चाहत्यांनी फोटो केले व्हायरल

आलियाला मुलगी होताच रणबीरचा तो खास व्हिडीओ होतोय व्हायरल
आलियाला मुलगी होताच रणबीरचा 'तो' खास व्हिडीओ होतोय व्हायरल
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 06, 2022 | 4:34 PM

मुंबई- अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे आई-बाबा झाल्याचं कळताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. आलियाला रविवारी (6 नोव्हेंबर) सकाळी मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं असता तिने मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. त्यानंतर अनेकांनी आलियाच्या लहानपणीचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. आलियाची मुलगी कशी दिसेल, त्यावरून कल्पना करत नेटकऱ्यांनी तिच्या बालपणीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तर काहींनी रणबीरची एक जुनी जाहिरात ट्विटरवर शेअर केली.

रणबीरने बऱ्याच वर्षांपूर्वी एका बिस्किटच्या ब्रँडसाठी ही जाहिरात केली होती. यामध्ये त्याच्यासोबत एक लहान मुलगीसुद्धा झळकली होती. ‘हे सत्यात उतरलंय’, असं कॅप्शन देत आनंदी चाहत्यांनी रणबीरची जाहिरात शेअर केली. या जाहिरातीत रणबीर त्या लहान मुलीसोबत मस्करी करताना दिसतोय. तिला बिस्किट दिल्यानंतर रणबीर तिला उचलतो आणि मिठी मारतो. ‘रणबीरला खरंच मुलगी हवी होती’, असेही कमेंट्स चाहत्यांनी केले आहेत.

आई-बाबा म्हणून सुरू झालेल्या आलिया आणि रणबीरच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 27 जून रोजी आलियाने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. इन्स्टाग्रामवर अल्ट्रासाऊंडचा फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. आलिया आण रणबीरने मुंबईत एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली. घरच्या घरीच मोजक्या कुटुंबीयांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता.

झोया अख्तर, सोफी चौधरी, नेहा धुपिया, रोहन श्रेष्ठा, कपिल शर्मा, रिया कपूर, इशान खट्टर, मौनी रॉय, सानिया मिर्झा यांसारख्या सेलिब्रिटींनीही आलियाच्या या पोस्टवर कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.